आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंज्युरी सर्टिफिकेट:आता सिव्हिल हॉस्पिटलमधून 24 तासांत मिळणार इंज्युरी सर्टिफिकेट

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस केसचा लवकर निपटारा करण्यासाठी आवश्यक असलेले इंज्युरी सर्टिफिकेट (जखमेचे प्रमाणपत्र) २४ तासांत देण्याचे आदेश प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रताप घोडके यांनी दिले असून यासाठी नोडल अधिकारी म्हणून क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वायाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रधान न्यायाधीश यांनी दिलेल्या सूचनेवरून रुग्णालय व्यवस्थापनाने हा विषय प्राधान्यक्रमावर घेतला आहे.

अपघात विभागात दाखल झालेल्या रुग्णाचे इंज्युरी सर्टिफिकेट पोलिस केसचा लवकर निपटारा करण्यासाठी आवश्यक असते. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडून हे प्रमाणपत्र उशिरा दिल्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची बाब प्रधान न्यायाधीश यांनी लक्षात आणून देत हे प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना गत आठवड्यात १५ नोव्हेंबर रोजी केल्या होत्या. यानुसार अपघात विभागात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत प्रलंबित असलेले सर्व इन्ज्युरी सर्टिफिकेट तात्काळ देण्यात यावे व दुसऱ्या दिवशी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट द्यावे. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून त्याचा अहवाल दर आठवड्याला प्रत्येक शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सादर करावा, असेही डॉ. घाेडके यांनी म्हटले आहे.

सर्टिफिकेटमध्ये असतात या नोंदी
जखमीचे नाव, वय, गाव, पत्ता, तपासण्याची वेळ, तारीख, जखम किती, कोठे व कशा प्रकारची आहे, जखम गंभीर आहे किंवा नाही, जखमेचे कारण, जखम होऊन किती वेळ झाला व शेवटी संबधित व्यक्तीला ओळखण्याच्या शारीरिक खुणा व डॉक्टरांचा सही, शिक्का. इंज्युरी सर्टिफिकेट पोलिस ठाण्यात गेल्याची गांभीर्याने दखल घेत तपासाला गती मिळते. तसेच दोषारोपपत्र सादर करताना हे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते, त्यामुळे इंज्युरी सर्टिफिकेट ताबडतोब मिळायला हवे.

बातम्या आणखी आहेत...