आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल चोरी:पीएसआय पेट्रोलिंगवर, कुटुंब गेले होते गौराईपूजनाला; चोरट्यांनी फोडले घर

जालना/अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील मूर्तींचा तपास लागत नसल्यामुळे पोलिस हतबल झालेले आहेत. त्यातच अंबड तालुक्यात चोरट्यांनी रविवारी रात्री तीन घरे फाेडली. यात अंबड येथील पीएसआयचेही घर फोडले. पीएसआय रात्री ड्यूटीवर होते, तर त्यांचे कुटुंब महालक्ष्मी सणासाठी गावाकडे गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चॅनल गेट तोडून आत प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला, अशी नाेंद पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत आहे.

जालना जिल्ह्यात काही महिन्यांपासून चोऱ्यांच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, अंबड ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक मधुकर त्र्यंबकराव पाटील हे कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री हे पेट्रोलिंगवर गेले होते, तर कुटुंब महालक्ष्मीचा सण असल्यामुळे गावाकडे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे चॅनल गेटसह मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसून कपाटातील ८ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला, अशी नाेंद पाेलिस तक्रारीत आहे. पोलिसाचेच घर फोडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.

अंबड पोलिसांनी पंचनामा केला. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश चव्हाण व उपनिरीक्षक ढाकणे करत आहेत. दोन घरांचा कडीकोयंडा तोडून चोरी : अंबड तालुक्यातील बोरी येथे दोन घरांचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा ६ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला, अशी तक्रारीत नाेंद आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीच्या पहिल्या घटनेमध्ये शेतकरी नितीन गोवर्धन थोरात (२९) हे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी पाठीमागील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. एका खोलीतील लोखंडी संदूक उचलून घराबाहेर नेऊन त्याचे कुलूप तोडले. त्यातील एक लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी नितीन थोरात यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीची दुसरी घटना बोरी येथीलच दामोदर सर्जेराव भोरे यांच्या घरी झाली.
भोरे कुटुंबीय शेजारच्या घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील संदूक उचलून बाहेर नेत त्याचे कुलूप उघडले. संदुकात असलेले रोख ५० हजार रुपये व ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. या घटनांमध्ये चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याने दोन्ही ठिकाणच्या चोरट्यांची एकच टोळी असावी अशा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. भोरे यांनीही अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले हाेते.

दोन दिवसांपूर्वीच कुंभेफळ येथे घरे फोडली
दोन दिवसांपूर्वीच जालना तालुक्यातील कुंभेफळ येथेही दोन शेतकऱ्यांची घरे फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे.याप्रकरणाचा आरोपींचा अजूनही शोध लागलेला नाही. चोऱ्यांच्या वारंवार घटना घडत असल्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...