आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेष:निमित्त नदीकाठावर शिव्यांच्या लाखोली वाहत रंगताे बोरीचा बार!

कृष्णा तिडके | जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण. महिला नटून-थटून वारुळाची पूजा करतात, झोक्याचा नंतर काही दिवस आनंद घेतात. सातारा जिल्ह्यातील सुखेड आणि बोरी ही दोन गावे मात्र या सणाच्या परंपरेला अपवाद आहेत. इथे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावातील महिला नदीकाठावर समोरा-समोर येऊन शिव्यांची लाखोली वाहतात. एखादे गाव जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत हा बोरीचा बार रंगत जातो.

खंडाळा तालुक्यातील बोरी हे १८०० तर सुखेड गावाची लोकसंख्या १४०० ही दोन्ही गावे. ही गावे बोरीचा बार या अगळ्या-वेगळ्या परंपरेसाठी ओळखली जातात. गावातील ज्येष्ठ मंडळीनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शंभरहूून अधिक वर्षापासून ही परंपरा आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या नदीकाठी या महिला एकत्र येतात. त्यानंतर हलगी आणि तुतारीच्या गजरात समोरा-समोर आलेल्या या महिलांमध्ये शिव्यांची लाखोली वाहण्याचा सामना सुुरू होतो. विशेष म्हणजे यात शाळकरी मुलींपासून ते वृध्द महिलांपर्यंत सर्व उत्साहाने सहभागी होतात. इतकेच नाही तर सासरी गेलेल्या गावातील मुली यात सहभागी होण्यासाठी खास माहेरी येतात. एखाद्या वर्षी तासाभरात हा सामना संपतो तर एखाद्या वर्षी हा बोरीचा बार तब्बल चार-चार तास रंगतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही परंपरा बंद करण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना यात यश आले नाही. कोराेनाच्या दोन वर्षांतही ही परंपरा सुरू होती आणि या वर्षीही नदीकाठावर हा खेळ रंगणार आहे.

कशी सुरू झाली ही अनोखी परंपरा? जवळपास शंभर वर्षापूर्वी बोरी गावाच्या पाटलाचे दोन विवाह झाले होते. एक पत्नी बोरीची तर दुसरी सुखेड गावची होती. दोघी सवतींमध्ये नेहमी वाद होई. त्या नदीवर धुणे धुण्यासाठी यायच्या तेव्हा त्यांच्यात दररोज शिवीगाळ व्हायची. येथे धुणे धुण्यासाठी आलेल्या दोन्ही गावातील महिला त्यांना प्रोत्साहन द्यायच्या. एकदा दोन सवतींमधील भांडणे रंगात आली असताना दोघींचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षांनी दोन्ही गावच्या मुली व महिला आजारी पडू लागल्या. तेव्हा महिलांनी दोघींच्या आठवणीत नागपंचमीनिमित्त शिव्यांची लाखोली वाहण्याचा नवस केला. ही दंतकथा आहे. याला कोणताही शास्रीय आधार नाही. कोरोना काळातही परंपरा सुरू ^आमच्या तीन-चार पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. गेली दोन वर्ष कोरोना काळातही परंपरा खंडित होऊ दिली नाही. दोन्हीही बाजूंच्या प्रत्येकी पाच महिलांच्या उपस्थितीत हा बार झाला. यावर्षीही हजारो महिलांच्या उपस्थितीत हा बार होईल. -भीमराव धायगुडे,सरपंच,सुखेड

अनिष्ट प्रथा बंद व्हावी ^माणसा-माणसांमधील भांडणे आणि द्वेष सध्या वाढत आहे. त्यामुळे शिव्या देण्याची ही अनिष्ट प्रथा बंद करून दोन्ही गावांनी एक चांगला पायंडा पाडवा. चांगला मनमोकळा संवाद करून त्यांनी एक नवी प्रथा निर्माण करावी. - हमीद दाभोलकर, कार्यकर्ते,अंनिस

सवतीचे उभारले मंदिर
दोन्ही गावांमध्ये असलेल्या नदीकाठी सवतीचे मंदीर उभारण्यात आले आहे. दर्शनासाठी महिला मोठ्या संख्येने येतात. ही परंपरा बंद झाली तर गावावर संकट येईल, अशी ग्रामस्थांमध्ये भीती आहे. त्यामुळे कोरोनाकाळातही दोन्ही गावातील प्रत्येकी पाच महिलांनी येथे येऊन पूजा केली व परंपरा सुरू ठेवली होती. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या प्रकाराला विरोध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...