आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एकाच्या नेत्रदानामुळे सहा जणांना होतो दृष्टी लाभ; अभय करवा यांचे प्रतिपादन

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दानात दान नेत्रदान सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यामुळे मृत्यूनंतरही आपणास जग पाहता येते. अर्थात नेत्रदान म्हणजे ‘मरावे परी दृष्टी रूपे मागे उरावे’ या उक्तीप्रमाणे आहे. मरणोपरांत नेत्रदानासाठी सर्व स्तरातून जनजागृतीची गरज आहे. एका जणाने केलेल्या नेत्रदानामुळे ६ जणांना दृष्टी लाभ होऊ शकतो, अशी माहिती नेत्रदान चळवळीतील अभय करवा यांनी दिली.

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुपसच्यावतीने नेत्रदान चळवळीतील समाजसेवी तथा आतापर्यंत ४०० जणांचे मरणोपरांत नेत्रदान करून घेणारे अभय करवा यांचा काल शुक्रवारी सत्कार करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामकुवर अग्रवाल यांची उपस्थिती होती. करवा म्हणाले, एका डोळ्यांमध्ये दृष्टीलाभासाठी आवश्यक असलेले तीन वेगवेगळे महत्त्वपूर्ण अवयव असतात. त्यामुळे एका जनाचा नेत्रदानातून ६ जणांना दृष्टीलाभ होऊ शकतो. नेत्रदानासाठी वयोमर्यादा नाही. एड्स आणि कर्करोगाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान चालत नाही.

या आजारातून बरे झालेल्यांना नेत्रदान करता येते, मोतीबिंदू असलेले तसेच चष्मा लागलेले व्यक्तीही मरणोपरांत नेत्रदान करू शकतात, आपण आतापर्यंत ६ दिवसाच्या बालकापासून ते १०५ वर्ष वयाच्या आजीबाईंचे मरणोपरांत नेत्रदान करून घेतले आहे. भारतात नेत्रदनाबाबत फारशी जनजागृती नाही. श्रीलंकेत मरणोपरांत नेत्रदान बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वात जास्त आयबॉल निर्यात करणारा देश श्रीलंका ठरला आहे. श्री गणपती नेत्रालयात नेत्रपेढी आहे. मात्र, गेल्या २० वर्षात म्हणावी तशी जनजागृती न झाल्याने वर्षभरात केवळ १०० च्या जवळपास नेत्रदान व्हायचे. आपण यात विशेष लक्ष घालून जनजागृती सुरू केली.

आपला संकल्प आणि धडपड पाहून श्री गणपती नेत्रालयानेही खंबीर साथ आणि प्रोत्साहनाचे बळ दिले. अध्यक्षीय समारोपात रामकुवर अग्रवाल यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून ऑगस्टमध्ये नेत्रदान पंधरवाडा राबविण्यात येऊन संकल्प पत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन अशोक हुरगट यांनी तर पवनकुमार सेठीया यांनी आभार मानले. यावेळी किशोर गुप्ता, अशोक मिश्रा, रामदेव श्रोत्रिय, रमेशचंद्र अग्रवाल, डॉ. रमेश सरवैय्या, हनुमानप्रसाद भारूका, रुक्मिणीकांत दिक्षित आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...