आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजारात सध्या हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू आहे. सुरूवातीला ४०० टनाची आवक असणाऱ्या मिरची बाजारात सध्या मागील आठवड्यापासून एक हजार टन मिरची व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आहे. सध्या मिरचीला बाजारात जवळजवळ चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खेळू लागला आहे. हिरव्या मिरचीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलेले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने मागील १५ वर्षापासून पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची पिकाकडे वळला आहे. मिरचीतून दरवर्षी चांगले उत्पन्न हाती लागत असल्याने या भागातील मिरची उत्पादक शेतकरी देखील वाढले असून, दिवसेंदिवस मिरची लागवडीत वाढ होत आहे. यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी जवळजवळ अडीच हजार हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु ऐन मिरची तोडणीच्या काळातच संततधार पावसाने मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उभ्या शेतातील मिरची पिक उपटून फेकावे लागले. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी अशा वातावरणात देखील मिरची पीक टिकवून ठेवले, अशा शेतकऱ्यांच्या मिरचीला सध्या बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे.
मध्यतरी पावसाच्या तडाख्यात मिरची खराब झाल्याने मिरचीच्या भावात कमालीची घसरण झाली होती. आता मात्र, हिरव्या मिरचीला जवळजवळ बाजारात चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे. सध्या बाजारात जवळजवळ पंचवीस ते तीस व्यापाऱ्यांकडून शेकडो शेतकऱ्यांची शिमला, तेजाफोर, शार्क वन, तलवार, ईगल, आरमार, नेत्रा, पिकेटोर, जेव्लरी, पकोडा आदी विविध प्रजातीची एक हजार टन मिरची खरेदी केली जात आहे. जवळजवळ बाजारात दररोज चार कोटी रुपयांची उलाढाल होते. दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या व्यापारी, शेतकऱ्यांना सुविधा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेकांना मिळतोय रोजगार
येथील मिरची बाजारात शेतकऱ्यांना समाधानकारक भाव दिला जात असल्याने या ठिकाणी खान्देश, विदर्भातील देखील मिरची विक्रीसाठी येत आहे. दररोज जवळजवळ लहानमोठ्या १५० गाड्या मिरची लोड होत आहे. मिरचीच्या निमित्ताने येथे मोठी वर्दळ राहते. त्यामुळे येथील स्थानिक व्यापारी हॉटेल, पान टपऱ्या, ढाबे, कृषी सेवा केंद्रांच्या देखील व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.