आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विविध खासगीरुग्णालयांचे किल‘बिल’:वसूल केलेले भरमसाट बिल परत करण्याचे खासगी रुग्णालयास आदेश; नगरमध्ये 150 बिलांत त्रुटी, पुणे-पिंपरी, बीडमध्येही समित्यांकडून पडताळणी

जालना/ नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना येथील दीपक रुग्णालयावर कारवाई, दिले होते 1 लाख 53 हजारांचे बिल

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांवर उपचारांची अवाजवी बिले लावून काही खासगी रुग्णालये लूट करत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. जालना शहरात चार रुग्णालयांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी आल्या होत्या. यातील दोन प्रकरणात कारवाई करताना दीपक रुग्णालयास वसूल केलेल्या रकमेपैकी ४३ हजार रुपये तीन दिवसांत परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुसरीकडे नगरमध्येही जिल्हाधिकाऱ्यांतर्फे नियुक्त ऑडिट समितीने चार रुग्णालयांवर कारवाई केली. आश्चर्याची बाब म्हणजे ऑडिट समितीने नगरमध्ये २८७ बिलांची पडताळणी केली. यात १५० बिलांमध्ये त्रुटी होत्या. दरम्यान, पुणे-पिंपरी चिंचवडसह अशा अवाजवी बिलांची लाखो रुपयांची रक्कम भरारी पथकांनी वसूल केली आहे.

... तर गुन्हे दाखल करणार

जास्तीचे शुल्क आकारले जात असेल तर त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळेच रुग्णांना हे पैसे परत दिले जात आहेत. काही रुग्णालये ऐकणार नसतील तर गुन्हे दाखल करावे लागतील. सर्व नियोजन तयार आहे. आता फक्त व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री

जालना : तीन दिवसांत ४३ हजार परत करण्याचे आदेश

एमआयडीसीतील एका कामगारास १५ जुलै रोजी ताप आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १८ जुलैला त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्रास झाल्यानंतर त्याला पुन्हा २४ जुलैला दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून न्युमोनिया व कोरोनाच्या लक्षणानुसार दहा दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले.

रुग्णालयाने दहा दिवसांचे तब्बल १ लाख ५३ हजार ३०८ रुपयांचे बिल आकारले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयात तक्रार दिल्यावर त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी फोन केला तेव्हा केवळ दहा हजार रुपये कमी करण्यात आले. ही आपबीती रुग्णाच्या पत्नीने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितली.

संयुक्त चौकशीत दिपक हॉस्पिटल दोषी :

या रुग्णाच्या पत्नीने ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर यांनी ८ सप्टेंबर रोजी दीपक हॉस्पिटलला नोटीस बजावून खुलासा मागवला. तसेच लेखा परीक्षक व नायब तहसीलदार यांनाही संयुक्त अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ४३ हजार ३१७ परत करण्याचे आदेश : दीपक हॉस्पिटल व्यवस्थापनाचा खुलासा रेमीडीसव्हीर इंजेक्शनच्या मर्यादेत मान्य करण्यात येत आहे. मात्र, हॉस्पिटलने रुग्णास आकारलेल्या अतिरिक्त ५३ हजार ११७ रुपयांपैकी रुग्णास दिलेल्या रेमीडीसव्हीर इंजेक्शनचे १० हजार ८०० रुपये कमी करून उर्वरित ४३ हजार ३१७ रुपये तीन दिवसांत रुग्णास परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी दिले.

गळ्यातील गंठण अन् व्याजाने पैसे काढून बिल भरले :

पतीला महिन्याला फक्त १५ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालते. यातच आजारपण आले. दीपक हॉस्पिटलने दीड लाखावर बिल आकारल्यामुळे गळ्यातील सोन्याचे गंठण विकावे लागले, व्याजाने पैसे काढून बिल भरावे लागले, असे संबंधित रुग्णाच्या पत्नीने सांगितले.

चार हॉस्पिटलच्या तक्रारी

जालन्यातील विवेकानंद, मिशन, संजीवनी व दीपक हॉस्पिटलने वाढीव बिल घेतल्याच्या तक्रारी होत्या. विवेकानंदने आकारलेले वाढीव बिल मुख्यमंत्री सहायता निधीत तर व दीपक हॉस्पिटलला पैसे परत करण्याचे आदेश दिले.

- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना

चंद्रपुरातही कारवाईसाठी समिती

शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, रुग्णालये अवाजवी बिल आकारून वसुली करत असल्याच्या तक्रारी वाढल्या. याला आळा घालण्यासासाठी चंद्रपूर पालिकेने विशेष अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

पुण्यात २ काेटींची बिले कमी केली

पुणे जिल्ह्यात खासगी रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची तपासणी लेखा परीक्षक करत आहेत. त्यानुसार आतापर्यंत १ हजार १६२ प्रकरणांत एकूण १४ काेटी ७५ लाख ६९ हजार रकमेपैकी २ काेटी २३ लाख ९० हजार रुपयांची बिले कमी करण्यात आली आहेत.

बीड : १ लाख ४२ हजार रु. वसूल

जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांकडून घेतलेल्या १०३ बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आले. यातून १ लाख ४२ हजार २०० रुपयांची बिले रुग्णालयांनी अधिक आकारल्याचे समोर आले. ती वसूल करून रुग्णांना परत केली जणार आहेत.

नगरमध्ये कोरोना रुग्णांच्या २८७ बिलांपैकी १५० बिलांमध्ये त्रुटी

खासगी रुग्णालयांत उपचार घेतलेल्या रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा तब्बल २ लाख १९ हजार ३७० रुपये जास्तीचे बिल आकारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हास्तर समितीने ही रक्कम संबंधित रुग्णालयांकडून वसूल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारापोटी १ लाखापेक्षा जास्त बिलांची आकारणी करण्यात आलेल्या बिलांची ६ ऑडिटरांच्या ६ पथकांमार्फत तपासणी सुरू पथकांनी २८७ बिले तपासली. त्यात १५० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या. त्यात सुमारे ४५ लाख २८ हजार ६८० रूपये शासनाच्या निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त. अहवाल उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडे सादर.

पहिल्या टप्प्यात समितीने ४ रुग्णालयांच्या २० बिलांवर आक्षेप घेत २ लाख १९ हजार ३७० वसुलीची रक्कम निश्चित केली.रक्कम वसूल करून संबंधित रुग्णाला देण्याबाबत मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना आदेश जारी करण्याचे निर्देश.