आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:पाच पैकी केवळ 2 कोटींचा मुद्देमाल जप्त; पालकमंत्र्यांनी घेतला गुन्हेगारीचा ‘आढावा’

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या, लूटमार वाढली; अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या, लूटमार या गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चालू वर्षातील मागील चार महिन्यांमध्ये चोरट्यांनी ५ कोटी ६९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांना यातील केवळ २ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल रिकव्हर करता आला आहे. या अनुषंगाने पालकमंत्री राजेश टोपे यांनी पोलिस प्रशासनासह व्यापाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित असलेले गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात पोलिसांचे अत्यल्प मनुष्यबळ असल्यामुळे पोलिस प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकसंख्या व परिसराच्या तुलनेत ठाण्यांची संख्याही कमी आहे. यामुळे अनेक गुन्हे प्रलंबित राहत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी महासंघाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकरी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग आदींसह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी असलेले विनीत साहनी यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते. जालना शहर व जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडकपणे कारवाई करावी. तसेच गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावावा, विशेषत:, औद्योगिक वसाहतीत अधिक लक्ष घालून उद्योजक, कामगार, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच या औद्योगिक वसाहतींमध्ये रात्री जास्त प्रमाणावर गस्त घालावी.

मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. शहर व ग्रामीण भागात पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वीच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. राज्याचे गृहमंत्री, सचिव व पोलिस महासंचालक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सुरक्षाविषयक बाबी व पोलिस ठाण्यांची संख्यावाढ याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिस प्रशासनाने या चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून घरफोड्या, दरोडे, चोऱ्यांतील आरोपी मात्र अजूनही फरार आहेत.

दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती : टोपे
महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी म्हणाले की, पालकमंत्री राजेश टोपे यांनी आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस मनुष्यबळ वाढवून देण्यासह दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले. आमदार कैलास गोरंट्याल यांनीही आमच्या मागण्यांना पाठबळ दिले. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. या आश्वासनांची तत्काळ पूर्तता करून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली.

दबावतंत्राने अतिक्रमण करणाऱ्यांचीही अजिबात गय करू नये
बोगस प्रॉपर्टी कार्डधारकांविरोधात कडक कारवाईची सूचना करताना पालकमंत्री टाेपे म्हणाले की, बोगस प्रॉपर्टी कार्डधारक हा गंभीर विषय असून अशा कार्डधारकांविरोधात जिल्हा व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. दबावतंत्राने अतिक्रमण करणाऱ्यांचीही अजिबात गय करू नये, कुठल्याही अवैध व्यवसायाला थारा मिळता कामा नये. पोलिसांनी वेळीच गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी सुरक्षा रक्षक नेमावा
दहा-वीस घरे मिळून नागरिकांनी आपापल्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमावेत. जेणेकरून पोलिसांना याची मदत होईल. तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची नगरपालिकेला आदेश देण्याची गरज आहे.

पोलिस ठाण्यांच्या संख्यावाढीसाठी केले जाताहेत प्रयत्न
पोलिस ठाण्यांच्या संख्यावाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...