आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यात मागील महिनाभरापासून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदनचे उपविभागीय अधिकारी अतुल चौरमारे यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून पाणंद रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत अकरा गावांत लोकसहभागातून पाणंद रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत, तर पाच गावांत कामे सुरू आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून असलेल्या पाणंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात पाच मशीनद्वारे कामे सुरू आहेत. यामध्ये दोन शासकीय मशीन आहे, तर तीन मशीन भारतीय जैन संघटनेच्या आहेत. तालुक्यात ६४ गावांत १५० पाणंद रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे.
तालुक्यात पाणंद रस्त्यांची वाट गेल्या कित्येक वर्षांपासून बिकट झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात तर या रस्त्यांनी चालायचे झाल्यास विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. परिणामी यामुळे शेती विकासदेखील खुंटला होता. अनेक वेळा या रस्त्यांनी अपघातदेखील घडले आहेत. त्यामुळे सदर पाणंद रस्ते व्हावेत यासाठी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि भोकरदन उपविभागीय अधिकारी अतुल चौरमारे यांनी मागील दीड महिन्यापूर्वी भोकरदन तालुक्यातील विविध गावांत पाणंद परिस्थिती हाताळून तालुक्यात कामाला जोरात सुरुवात केली आहे. महिनाभरात अकरा गावांत २१ किलोमीटरपर्यंतचे पाणंद रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे हे रस्ते चकाचक झाले आहेत.
प्रशासनाने यापुढे खडीकरणासाठीदेखील प्रयत्न करावेत अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अकरा गावांतील शेतकऱ्यांचा अडचणीचा मार्ग मोकळा झाला असल्याने शेतकऱ्यांना शेती विकासात मदत होणार आहे. शेतकरीदेखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
भोकरदन तालुक्यातील ६४ गावांत १५० पाणंद रस्त्यांचे काम मार्गी लागणार
नक्कीच शेती विकासाला चालना मिळेल
भोकरदन तालुक्यात मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले जात आहे. आतापर्यंत अकरा गावांत कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावातदेखील पावसाळ्यापूर्वी कामे करण्यावर आमचा भर आहे. शेतकऱ्यांनीदेखील पुढाकार घेऊन पाणंद रस्ते तयार करून घ्यावेत. कारण रस्त्यामुळे शेती विकासाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या प्रगतीत वाढ होणार आहे.
अतुल चौरमारे, उपविभागीय अधिकारी, भोकरदन.
शेतकऱ्यांनीदेखील वादविवाद न करता लोकसहभागातून रस्ता तयार करून घेणे गरजेचे
भोकरदन तालुक्यात महसूल प्रशासनाकडून यशस्वी नियोजन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत पाणंद रस्त्याची कामे पूर्ण केली जात आहेत. आतापर्यंत अकरा गावांत पाणंद रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये उमरखेडा, लोनगाव, पिंपळगाव बारव, पळसखेडा ठोंबरे, लिंगेवाडी, पोखरी, सुरंगळी, सिरजगाव मंडप, खंडाळा, दगडवाडी, कोदोली, देऊळगाव कमान, गोषेगाव, वझीरखेडा आदी गावांचा समावेश आहे. सध्या दगडवाडी, गोर्दी, गोषेगाव, पिंपळगाव बारव आणी धावडा आदी गावांत पाच मशीनद्वारे पाणंद रस्त्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. तालुक्यात पाच मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये शासकीय मशीन दोन आहेत, तर तीन मशीन भारतीय जैन संघटनेच्या आहेत. शेतकऱ्यांनीदेखील वादविवाद न करता लोकसहभागातून रस्ता तयार करून घेणे गरजेचे आहे. कारण भविष्यात ही योजना येते किंवा नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संधीचे सोने करून घ्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.