आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांनी मुलांना द्यायला हवे : कल्याण बागल

परतूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये पार पडला पारितोषिक वितरण समारंभ

आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता, आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांनी मुलांना द्यायला हवे. आवडीच्या क्षेत्रात यश मिळवणे निश्चितपणे सुलभ आणि सोयीचे ठरू शकते. विशेषतः आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील मुले अधिक हुशार आणि तत्पर आहेत. पारंपरिक वलय प्राप्त झालेल्या क्षेत्रांपेक्षा इतरही अनेक क्षेत्रे आज मुलांना खुणावत आहेत. पालकांनी आजघडीला नवीन बदलांचा स्वीकार करत मुलांच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी कल्याणराव बागल यांनी केले. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल आणि बचपन प्ले स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगभरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अभय काळुंके, पत्रकार आशिष गारकर, मुख्याध्यापिका मीनाक्षी काळुंके, संजय व्यवहारे, लंका भवर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या.

ग्रामीण भागात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग या ठिकाणी फारसा यशस्वी होऊ शकला नाही. ग्रामीण भागातील मुले शैक्षणिक प्रवाहापासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना, अशा छोट्या स्पर्धांच्या आयोजनातून निश्चितपणे मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यास मदत होईल, असे पुढे बोलताना बागल म्हणाले. छोट्या वर्गातील मुलांची मानसिकता, त्यांची आवडनिवड लक्षात घेऊन विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन वर्षभराच्या कालावधीत शाळेत केले जाते. विद्यार्थी केंद्रबिंदू गृहीत धरून प्रत्येक उपक्रमाचे नियोजन केले जात असल्याने याचा फायदा व्यक्तिमत्त्व विकासात निश्चितपणे होतो, असे मत संस्थेचे अध्यक्ष अभय काळुंके यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विविध वयोगटांतील मुले, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...