आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनव आंदोलन:ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी परतूरच्या शेतकऱ्याने घरातच सुरू केले उपोषण

आशिष गारकर | परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवने यांच्या उपोषणचा 12 वा दिवस, ग्रामगीतेचे वाचन

मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यातून सावरण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी परतूर येथील शिवाजी सवने यांनी गत २२ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे कुठल्याही शासकीय कार्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी हे उपोषण आपल्या राहत्या घरीच सुरू केले आहे.

लाक्षणिक उपोषण करताना सवने यांनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे वाचन सुरू केले आहे. तेरा दिवसांपासून हे लाक्षणिक उपोषण सुरू असताना प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला अाहे. एकही अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी गेला नाही. दहाव्या दिवशी महसूल प्रशासनाने एका मंडळ अधिकाऱ्याला चार पानाचे पत्र घेऊन पाठवले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेमकी कोणती कार्यवाही केली याची अधिकृत माहिती आपल्याला द्या, कागदी घोडे नको, म्हणत सवने यांनी आपला उपोषणाचा निर्णय कायम ठेवला आहे. या उलट आपली मागणी पूर्ण होत नसेल तर प्रशासनाने आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केल्याने खळबळ उडाली आहे.

आत्महत्येनंतर दखल घेणार का?

अतिवृष्टीमुळे आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन आपण पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी तातडीची आर्थिक मदत गरजेची आहे. याच मागणीसाठी मी हे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. माझ्या उपोषणाची दखल घेत नाही तर, माझ्या आत्महत्येनंतर प्रशासन दखल घेणार का? -शिवाजी सवने, उपोषणकर्ते.

तहसीलदारांना पाठवले

तहसीलदारांमार्फत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी पाठवले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या उद्देशातून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. याबाबतची माहिती सवने यांना पत्राद्वारे कळवली आहे. यापेक्षा अजून आम्ही काय करू शकतो? - भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर