आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे आजच्या स्थितीत काळाची गरज; डॉ. विजयकुमार फड यांचे कीर्तनात निरूपण, नांदखेडा येथे सप्ताहात गुंफले पुष्प

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी अडवणे हे जसे सर्वांचे कर्तव्य आहे तसे उपलब्ध पाण्याचा नियोजनबध्द वापर करणे हेही महत्त्वाचे कर्तव्य असून हा आदर्श भक्तीचा आधारस्तंभ होय. तसेच ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. विजयकुमार फड यांनी केले. जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथे धार्मिक सोहळ्याच्या सप्ताहातील कीर्तनाचा एक भाग म्हणून डॉ. विजयकुमार फड यांनी पाण्याचे महत्व स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने संतांचे विचार या विषयावर कीर्तन केले.

पाणी अडवणे हे जसे सर्वांचे कर्तव्य आहे तसे उपलब्ध पाण्याचा नियोजनबध्द वापर करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य असून हा राष्ट्र भक्तीचा एक अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. कर्तव्य व जबाबदारी आणि सामाजिक व राष्ट्रीय कार्यातील सहभाग हाच सर्वश्रेष्ठ भक्तीमार्ग या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना आपण कसेही वागा कांही लोक कांही तरी नांव ठेवतच असतात. लोक नांव ठेवतात म्हणून आपल्या सद्बुध्दीला पटेल तसे वागणे सोडून देणे, त्याचा ताण घेणे, चिडून स्वत:ला शिक्षा देणे चुकीचे असते.

आपण कसे वागायचे ते आपण ठरवायचे असते, आपण ईतरांच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही हे जरी सत्य असले तरीही आपण आपल्या स्वत:च्या कानावर हात ठेवू शकतो, म्हणून दुसऱ्यांच्या तोंडावर हात ठेवण्यापेक्षा प्रसंगानुरूप स्वत:चे कान बंद करावेत म्हणजे वादही टळतो व ताणही जातो. स्वत:च्या कार्याचे स्वत: साक्षीदार होणे, नको तो विचार करुन खचून न जाणे, व्यसन न करणे, मुलं हिच खरी संपत्ती समजून त्यांना घडवणे इत्यादी आपल्या जीवनात उतरवले तर जीवन आनंदी होऊ शकेल. काळात प्रचंड ताकद आहे. आजची परिस्थिती उद्या राहत नसते. त्यामुळे नैराश्य झटकून आशेने जगावे.

नकारात्क परिस्थितीत मी आत्महत्या करेन, जगण्यात मजा नाही, माझ्या मरण्याने बाकीचे तरी सुखी होतील असे रागाच्या किंवा ताणाच्या भरातही म्हणू नये. या जन्मावर अभिमान बाळगावा. प्रयत्नाने दगडाचा देव होतो तर व्यक्तीचा माणूस होणार नाही का? जीवनात सकारात्मकता व सातत्य अत्यंत आवश्यक आहे, असेही डॉ. फड म्हणाले. किर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी नांदखेडा निल सवडे, योगेश सवडे, बबन जंजाळ, संतोष सवडे, एकनाथ सवडे, सुभाष पाटील, दत्तात्रय सवडे, अंबादास सवडे, मारोती सवडे, सुरेश सवडे, कारभारी सवडे, दिलीप सवडे, लिंबाजी सवडे, अशोक सवडे, भानुदास सवडे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...