आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:जिल्ह्यात साजरा होणार प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण, उत्सव शांततेत व शिस्तबद्ध रीतीने साजरे करण्याची जालना जिल्ह्याची परंपरा आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही परंपरा कायम राखत हा उत्सव अत्यंत शांततेत तसेच दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साजरा करावा. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सार्वजनिक श्री गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने गुरुवारी समन्वय व शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात डॉ. राठोड बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, स्वप्निल कापडणीस, भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. गणेश मंडळाच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले. दुर्घटना घडू नये याची काळजी घ्या : गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येते. अशा वेळी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा डीपी आदींची तातडीने दुरुस्ती करून घेण्यात यावी. गणेशोत्सवात वीजपुरवठा खंडित होणार नाही याबाबतची महावितरणने दक्षता घ्यावी. महामंडळांनीही विद्युत विभागाकडून अधिकृतरीत्या वीजजोडणी घेण्याचे आवाहनही डॉ. राठोड यांनी केले.

खड्डे बुजवा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा गणेश मंडळाच्या ठिकाणी व ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक निघणार आहे अशा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत व परिसर स्वच्छ करण्यात यावा. मिरवणूक मार्गाची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या पाहणी करून त्या ठिकाणी आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्यात यावी. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहने तसेच पादचाऱ्यांना त्रास होत असून वाहतुकीचाही खोळंबा होतो. त्यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, असेही डॉ. राठोड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...