आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वेदनांची सल कागदावर उमटते अन् तिथेच काव्य जन्माला येते : कवयित्री दिशा शेख; तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी उलगडला त्यांच्या कवितांचा प्रवास

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस होण्याची वाट चालते,
सत्ता शोषणाच्या चिंध्या जाळते,
क्रांतीच्या मशाली पेटवण्यासाठी
प्रत्येक नर नारीतील,
हिजडा जागा करण्यासाठी वाजते
माझी टाळी...

हे शब्द आहेत तृतीयपंथी कवियत्री दिशा पिंकी शेख यांचे. या दुनियेत वावरतांना समाजाने ज्या वेदना दिल्या, त्याचे अनुभव काट्यासारखे टोचतात. हे टोचलेले काटे आता कुरूप झाले आहेत. त्याची सल जेव्हा मी बोलून दाखवते तेच शब्द कागदावर उमटल्यावर त्याची कविता तयार होते. या शब्दात दिशा शेख यांनी आपल्या काव्य लेखनाचा प्रवास उलगडून दाखवला.

कवितेचा पाडवा या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर येथील कवयित्री दिशा पिंकी शेख यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी दिशा शेख यांनी आपल्या काव्य प्रवास आणि अनुभव याचे दाहक अनुभव सांगितले. सातवीपर्यंत नियमित शाळेत शिकल्यानंतर दिशा यांना आपल्या शरीरात बदल जाणवायला लागले. सोबतचे विद्यार्थीही नावे ठेवायला लागली. त्यामुळे त्यांनी सातवीनंतर शाळा सोडली.. दहावीपर्यंतचे शिक्षण बाहेरूनच पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिकताना जे दाहक अनुभव आले पुन्हा येऊ नये म्हणून शिक्षणाला राम राम ठोकला. समाजात वावरतानाही तृतीयपंथी म्हणून जी हिणकस वागणूक दिली जाते त्याने दिशा यांना अस्वस्थ केले. त्यातूनच त्यांनी आपले अनुभव कागदावर लिहिण्यास सुरुवात केली. २०१४ पासून त्यांना कविता सादर करण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर संधी मिळाली. नंतर त्यांनी कधी मागे फिरून पाहिलेच नाही.

सामाजिक कार्यातही अग्रेसर : दिशा शेख यांनी तृतीयपंथीयांसाठी काम करताना विविध उपक्रम राबवले आहेत. तृतीयपंथी समाज सेवा संस्थेच्या त्या सदस्य आहेत. तृतीयपंथी विकास मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्य सरकारने तृतीयपंथीयांच्या विकास मंडळाला निधी द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

औद्योगिक वसाहत द्या : तृतीयपंथी वेगवेगळ्या ठिकाणी बाजार मागताना दिसतात. या हातांना काम देण्यासाठी तृतीयपंथी विकास मंडळाच्या माध्यमातून मदत होऊ शकते. सरकारने या मंडळाला निधी दिला तर तृतीयपंथीयांची एक स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करता येईल. या वसाहतीत वसाहतीत छोटे- छोटे उद्योग उभे राहिले तर आज काम मागणारे हात काम देणारे हात ठरतील, असा विश्वास दिशा यांनी व्यक्त केला आहे. यासाठी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

कवितासंग्रह झाला प्रकाशित
दिशा यांनी आपल्या दाहक अनुभवावर आधारित ‘कुरूप’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहात ३८ कविता आहेत. अनेक तृतीयपंथी लिहीत आहेत आणि शिकत आहेत. या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून पुढील काळात त्याला व्यापक स्वरूप देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे दिशा शेख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...