आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण-उत्सव:कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच भरलेला पोळा सण जिल्हाभरात उत्साहात साजरा

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक पध्दतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. गावागावात बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढून पूजन करण्यात आले. बैलांची सजावट करण्यात आली होती.

भोकरदन शहर शहरातील मुख्य पोळा हा जुन्या बाजारपट्टीतील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या समोर वेशीत भरतो. पारंपरिक मान असलेले नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते मानाची बैलाची पूजा करून पोळा फोडण्यात आला. हा पोळा मारुती मंदिरासमोर भरवण्यात आला. वेशीतील तोरणाखाली सर्व बैल जमा झाल्यानंतर मानाच्या बैलाची पूजा करून पोळा फोडण्यात आला. यावेळी शेतकरी आपल्या बैल जोड्या वाजत गाजत पोळ्यामध्ये घेऊन आले. शहरात चार ठिकाणी पोळा भरवण्यात येतो. दक्षिण मुखी मारुती मंदिराच्या समोर वेशित त्याचप्रमाणे दानापूर् वेषित, नवीन भोकरदन येथील मारुती मंदिरासमोर व उस्मान पेठ मधील मारुती मंदिर समोर अशा चार ठिकाणी बैलपोळा भरवण्यात आला.

पळसखेडा तालुक्यातील पळसखेडा पालवे येथील शेतकरी दिगंबर दत्ताराव पालवे यांनी देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पोळा सणानिमित्त सर्जा राजांना तिरंगा रंगाने सजवून पोळा साजरा केला.

धावडा परिसर भोकरदन तालुक्यातील धावडा येथे कोरोना महामारीचे निर्बध हटवल्यानंतर गावातील तिन्ही वेशीला तोरण बांधण्यात येऊन पोळा भरवण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याने बैलाला गावातून मिरवत आणले. घरोघरी महिलांनी बैलाची पूजा करून औक्षण करीत पुरणपोळीचा नैवैद्य खाऊ घातला.

खासगाव जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता बैलपोळा फोडण्यात आला. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्जा राजाची पूजा केली. तत्पूर्वी गावातून मिरवणूक काढली. यावेळी सरपंच संतोष लोखंडे, संतोष कोल्हे, संजय लोखंडे, सुधीर पाटील, शेपीसेठ, समाधान लोखंडे आदी उपस्थित होते.

जळगाव सपकाळ भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. जळगावकरांनी आनंदाने बैलपोळा साजरा केला.

बारवाले विद्यालय बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील पद्मभूषण डॉ. बद्रीनारायणजी बारवाले विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मातीचे सुंदर असे बैल तयार करून रंगरांगोटी करून त्यावर सुंदर साज चढवला. या सृजशीलतेला व गुणाला वाव मिळावा, यासाठी संस्था अध्यक्ष सोलाट यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सहशिक्षक अंभोरे यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळा या सणानिमित्त सविस्तर माहिती दिली. यावेळी पालक उपस्थित हाेेते.

डॉ. बावस्कर हस्ते पूजन भोकरदन तालुक्यातील देहड येथे पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करण्यात आली. यावेळी डॉ. बावस्कर यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विंचू दंशावर लस संशोधन केलेले व नुकतेच राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित आलेले डॉ. बावस्कर यांचे मूळगाव भोकरदन तालुक्यातील देहेड आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉक्टर बावस्कर यांची आजही गावाशी कायम नाळ जोडलेली आहे. यावेळी डॉ. जनार्दन बावस्कर यांच्यासह परिसरातील शेतकरी, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...