आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी राजेश टोपे-सतीश घाटगेंमध्ये राजकीय संघर्ष

विठ्ठल काळे । कुंभार पिंपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना चांगलीच रंगत आली आहे. घनसावंगी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये राजेश टोपे-सतीश घाटगे आमने-सामने असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. ग्रामपंचायती निवडणूकांच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती कोण जिंकतो, यातून एकप्रकारे राजकीय संघर्षच निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रचाराला खासगी शिक्षण संस्थांमधील कर्मचारी नेमू नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी निवडणूक विभागाला निवेदन दिले आहे.

न्यायालयात दाखल याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील ९७ पैकी ३४ ग्रामपंचायतीचा निवडणुका पार पडत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात प्रामुख्याने तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या कुंभार पिंपळगाव, राणीउंचेगाव, पिंपरखेड, मूर्ती, लिंबी, बोलेगाव, भेंडाळा, अरगडे गव्हाण या गावांमध्ये महत्त्वाच्या लढती होणार असल्याचे दिसत आहे. घनसावंगी मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलेले समृद्धी उद्योग समूहाचे चेअरमन सतीशराव घाटगे पाटील यांची ग्रामपंचायत बरोबर आता बाजार समितीच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ठरणार असल्याचे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. घनसावंगी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे १०८ तर सदस्य पदाकरता ६५५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

यामुळे निवडणुकीतील लढती रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक पॅनलचे प्रचाराचे नारळ देखील फुटून निवडणुकीची रंगत वाढतच चाललेली आहे. बहुमत मिळविण्यापेक्षा सत्ता काबीज करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच पदावर केंद्रित असलेली निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने ही निवडणूक विकासाचा मुद्दा यासह नागरी सुविधा या प्रश्नावर गाजणार आहे. गटातटाच्या राजकारणाच्या राजकीय संघर्षात कोणाची जिरवायची याबाबत छुपे डावपेच सुरू झाले आहेत. त्यामुळे स्थानिक दृष्टीने सोयीचे राजकारण करून राजकीय आघाड्या अस्तित्वात आल्याची चर्चा सुरु आहे. शिवाय तालुक्यातील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग आला असून कोणी - कोणी या निवडणुकीसाठी कशाप्रकारे फिल्डिंग लावली ती आता कशी उपयोगात येते. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी द्यावी. शिवाय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात व्हावे असे निर्देश देण्यात आले आहेत,असे आवाहन तहसीलदार कविता गायकवाड यांनी केले आहे.

सोशल मीडियावर उमेदवारांची हवा
तालुक्यातील निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी आपापले बॅनर, रील, लाऊड स्पीकर, स्टिकर अशा अनेक प्रकारे सोशल मीडियावर जाहिराती पसरवल्याचे दिसत आहेत. यावर उमेदवारांचा फोटो, चिन्ह, जाहीरनामा, मतदानाची तारीख शिवाय मतदान करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात असून या शेकोट्याभोवती गावातील राजकारणाच्या चांगल्याच गप्पा रंगत आहे.

११७ बॅलेट तर २०० कंट्रोल युनिट
घनसावंगी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११७ मतदान केंद्र स्थापन करून मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून १३५ तर मतदान अधिकारी म्हणून ४०४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी ११७ बॅलेट तर २०० कंट्रोल युनिट तयार करण्यात आलेले आहेत. या ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५२६०५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मतदार कुठल्या उमेदवाराला अधिक पसंती देणार हे २० डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

शिक्षण संस्थांवरील कर्मचारी नेमू नये
खाजगी शिक्षण संस्था वरील कर्मचारी नेमण्यात आल्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने यात लक्ष घालावे. खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिल्यास अडचणीत वाढ निर्माण होऊ शकते. शिवाय खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची संधी देऊ नये, असे निवडणूक विभागाला निवेदन दिल्याचे सतीशराव घाटगे पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...