आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१० जूनच्या दिवशी मान्सूनपूर्व हलक्याशा पावसाने वीज वितरण विभागाची दाणादाण उडाली असून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, टेम्भी अंतरवाली, सिंदखेड, देवडी हादगाव या ठिकाणचे ३३ केव्ही सबस्टेशन अंतर्गत ९२ गावांची वीज शुक्रवारी संध्याकाळी ८ ते शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत अशी तब्बल १८ तास गुल झाली होती. लाईट नसल्याने प्रचंड उकाड्याने झोपेचे खोबरे होऊन नागरिकांचे प्रचंड बेहाल झाले होते. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर होते त्यांच्याही इन्व्हर्टरची बॅटरी मध्यरात्री डाऊन झाली होती.
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची विजेच्या कडकडाटासह हलकीशी सरी पडली होती. त्यामुळे घनसावंगीच्या सुतगीरणी चौक ते तीर्थपुरी रस्त्यावरील मदरसा जवळ उच्च दाब वाहिनीचे पोलवरील इन्सुलेटर फुटले असल्याने वरील ठिकाणच्या सबस्टेशन अंतर्गत ९२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल १८ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने गर्मीमुळे ९२ गावातील ग्रामस्थ रात्रभर जागेच राहिले होते. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर होते त्यांचेही इन्व्हर्टर ऐन मध्यरात्रीला डाऊन झाले. दरम्यान तालुक्यात किरकोळ कारणावरून वीज गुल होण्याचे प्रकार सतत चालू राहत असून वितरण कंपनी कडून मान्सूनपूर्व दुरुस्ती केवळ कागदावरच करत असल्याचे यावरून दिसून येते.
दरम्यान शनिवारी दुपारी पूर्ववत केलेला वीजपुरवठा एक तासानंतर पुन्हा खंडीत झाला होता. पावसात अशा किरकोळ बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून दक्षता घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर जोरदार वाऱ्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड परिसरातील दहा पोल पडल्याने वीज पुरवठा पुन्हा खंडीत झाला आहे. मात्र तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, देवडी हदगाव परिसरातील वीज पुरवठा दुपानंतर सुरळीत करण्यात आला.
युद्धपातळीवर काम केले कर्मचाऱ्यांनी
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास फॉल्ट झाल्याने लाईट गेली होती. रात्री उशिरापर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊनही फॉल्ट सापडला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून शोध घेऊन दुपारी एका ठिकाणी खांबावरील तार तुटली व इंस्युलेटर फुटल्याचे निदर्शनास आले. ते तत्काळ दुरुस्त करून लाईट पूर्ववत केली.
व्यंकटेश परसे, शाखा अभियंता, ३३ केव्ही सबस्टेशन तीर्थपुरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.