आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवाजवी करवाढ:परतूर शहरातील मालमत्ता करात वाढ, राष्ट्रवादीचे उच्च न्यायालयात आव्हान; उच्च न्यायालयात जनहित याचिका

परतूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मालमत्ता करवाढीचा मुद्दा मागील चार महिन्यांपासून तापलेला असतांना एन निवडणुकीच्या तोंडावर यावरून शहरातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे यांनी पालिकेच्या वतीने मालमत्ता करवाढीसाठी केलेले सर्वेक्षण सदोष असल्याचे सांगत या सर्वेक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या संबंधी एक जनहित याचिका काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्वतः विनायकराव काळे यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष अंकुशराव तेलगड, आरेफ आली, कदीर कुरेशी, परवेज देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

दरचार वर्षानी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून प्रचलित पद्धतीने मालमत्ता करात वाढ करण्याची तरतूद आहे. या तरतूदीनुसार शहरातील दहा हजार पाचशे मालमत्तांचे सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी २०२० मध्ये पालिकेने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मालमत्ता सर्वेक्षण बाह्यस्त्रोताकडून करून घ्यावयाचे असल्यास त्या साठी प्रति मालमत्ता २३५ या प्रमाणे दर ठरविण्यात आला आहे.

शहरातील १० हजार ५०० मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार अंदाजे २५ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविणे अपेक्षित असतांना, तत्कालीन कार्यकारी नगराध्यक्ष आणि मुख्याधिका-यांनी ९३ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.रवींद्र बिनवडे यांनी देखील सदरील ९३ रुपये खर्चाला मंजूरी देत आर. एस. कन्स्ट्रक्शन यांना कार्यारंभ आदेश दिले होते. नगरसेवक अंकुशराव तेलगड आणि पोरवाल यांनी यावर आक्षेप घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने ९३ लाखांचे कार्यारंभ आदेश रद्द करून ५३ लाख रुपयांचे सुधारित कार्यारंभ आदेश पुन्हा आर. एस. कन्स्ट्रक्शन यांच्या नावे काढण्यात आले.

दरम्यानच्या काळात शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण प्रक्षिशीत मनुष्यबळाच्या सहाय्याने करणे गरजेचे असतांना, शहरातील पंचर दुकानावर काम करणाऱ्या, कुठलेही तांत्रिक ज्ञान नसणाऱ्या लोकांच्या हातून ही काम थातुर मातुर पद्धतीने उरकून घेतले. आर. एस. कन्स्ट्रक्शन केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक मालमत्ता धारकांना जास्तीची करआकारणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कपिल आकात यांनी दिली आहे.

अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेल्या करवाढीस विरोध
परतूरच्या नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेल्या या करवाढीला आव्हान देण्यासाठी सदरील जनहित याचिका अड. संभाजी टोपे, अॅड. विशाल बागल यांच्या मध्यमातून दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनासह संबंधित विभागाचे सचिव, उपसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हाधिकारी, सहायक संचालक, पालिका मुख्याधिकारी आणि आर. एस. कन्स्ट्रक्शन यांना प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे यांनी दिली आहे.

स्वबळाबर राष्ट्रवादी
येत्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वच्या सर्व २३ जागा स्वबळावर लढविणार असून त्या जिंकून आणण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. आवश्यक ती रणनीती आखली जात आहे. आगामी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल असा दावा आकात यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...