आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा इशारा:डॉक्टरच्या सेवासमाप्तीचा प्रस्ताव; 2 कर्मचाऱ्यांच्या 2 वेतनवाढी रोखणार

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी सायंकाळी आरोग्य केंद्राला कुलूप असल्याने गरोदर माता प्रवेशद्वारातच प्रसूत झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव यांच्या सेवा समाप्तीचा प्रस्ताव सिव्हिल सर्जनमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे, तर आरोग्य सहायिका व्ही. एन. गायकवाड, आरोग्यसेविका टी. एस. अहिरे यांच्या २ वेतनवाढी २ वर्षांसाठी रोखण्याची शिफारस जि. प. सीईओंकडे केली आहे.

शिवाय अंबड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कांगणे यांच्याही विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापुढे रुग्णांची हेळसांड न होता तत्काळ उपचार-सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर नियंत्रणाची जबाबदारी सोपवली असून त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागवले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे तेथील ड्यूटीवरील डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही कुणीच न आल्याने असह्य कळा सहन करत मातेने एका गोंडस कन्येला जन्म दिला. त्या वेळी आजूबाजूच्या महिला मदतीला धावल्यामुळे माता रूपाली राहुल हारे व कन्या सुखरूप असून त्यांची प्रकृती चांगली अाहे. मात्र, या प्रकरणानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा उघडकीस आल्यामुळे गैरहजर राहणाऱ्या डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी केली होती.

खुद्द जि. प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, माजी आरोग्य सभापती सतीश टोपे यांच्यासह रुग्णाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी शनिवारी सकाळीच प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून तेथील समस्यांचा आढावा घेतला होता. कामाचे दैनंदिन वेळापत्रक ठरवून दिल्यानंतरही संबंधित डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी वेळेवर येत नाहीत, मोबाइलद्वारे संपर्क करूनही प्रतिसाद देत नाही यामुळे रुग्णांची अाबाळ होते. यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत डॉ. खतगावकर यांनी संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीच्या शिफारशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. शिवाय यापुढे कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर शासकीय संस्थांवरील नियंत्रणाची जबाबदारी
जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमधून रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा मिळत आहे की नाही, ठरवून दिलेल्या वेळापत्रकाचे पालन होते किंवा नाही, स्वच्छतेची काय स्थिती आहे याची खातरजमा करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी नेमून दिलेल्या आरोग्य संस्थेला अचानक भेटी देऊन तेथील माहिती व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर शेअर करावी. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना आहेत. मात्र, यात खंड पडत असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना डॉ. खतगावकर यांनी दिल्या आहेत.

टीएचओंचेही तालुक्यावर नाही नियंत्रण
अंबड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. आरोग्य केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची दरमहा उपस्थिती नियमित पाठवत नाही. यामुळे कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका ठेवून त्यांचा विभागीय चौकशीचा प्रस्ताव जि. प. सीईओ मनुज जिंदल यांच्यामार्फत आयुक्तांना पाठवला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...