आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात तीर्थपुरीत आंदोलन

तीर्थपुरी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना राज्यपालपदावरून तत्काळ काढून टाकण्यासाठी घनसावंगी तालुका काँग्रेसच्या वतीने तीर्थपुरी येथे गुरुवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी दोघांचीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची केलेली वक्तव्ये निंदनीय आणि संतापजनक असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामप्रसाद खरात या वेळी म्हणाले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसल्यावर सतत त्यांचाच अपमान करतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे.

राज्यपाल कोश्यारी व भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजपच्या नेत्यांशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला असून महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेणार नाही. अश्या वादग्रस्त राज्यपालांची तत्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपने जाहीर माफी मागावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष रामप्रसाद खरात यांनी दिला. या आंदोलनात संदीप मस्के, बंडुराव सोमवारे, संतोष चोथे, तायडे मामा, तुकाराम पठाडे, माजी सरपंच हरिभाऊ मिरकड, विष्णू आरसुडे, अनिकेत राखुंडे, सखाराम खरात, जालिंदर कोरे, रामेश्वर मोटे, बंडूभाऊ सोमवारे, सिताराम शिंदे, पंडित कोकाटे, नारायण तौर, कल्याण खरात आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...