आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी तीन तास चाललेल्या जनसुनावणीत ११४ महिलांनी आपली कैफियत राज्य महिला आयोगासमोर मांडली. त्यानंतरही ५० ते ६० महिलांनी तक्रारी मांडल्या. यावर आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा महिलांचे प्रश्न सोडवण्यात कमी पडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील २२ जिल्ह्यांत जनसुनावणी घेतली. यात सर्वाधिक तक्रारींची संख्या जालन्यात असल्याचे निरीक्षण आयोगाने नाेंदवले.
येत्या १५ दिवसांत या तक्रारींचे निराकरण करा, भ्रूणहत्या रोखण्यासाठी धाडसत्र राबवा, अवैध गर्भपात केंद्र-सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करा, बालविवाहास प्रतिबंध घाला व कार्यवाहीचा अहवाल द्या, असे निर्देश आयोगाने दिले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्यभरात जनसुनावणी घेतली जात आहे. यानुसार गुरुवारी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जनसुनावणी घेतली. या वेळी एसपी डॉ. अक्षय शिंदे, जि. प. सीईओ वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे,महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण आदींची उपस्थिती होती.
यंत्रणांची कामे असमाधानी, सरकारला देणार अहवाल
गोपनीय अहवालातून सर्व माहिती मिळत असते. त्यामुळे विविध विभागांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवर फारसा विश्वास नाही. राज्यभरात जनसुनावणी घेतल्या, मात्र सर्वाधिक ११४ तक्रारी जालन्यातून आल्या. अजूनही ५०-६० तक्रारी आहेत. येथील प्रशासकीय यंत्रणा नीटपणे काम करत नाही हेच यातून दिसून येते. येत्या १५ दिवसांत यात सुधारणा न झाल्यास जबाबदारी निश्चित करून सरकारला अहवाल देणार आहोत. - रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.
बालविवाह रोखणे ही सामुहिक जबाबदारी, दोषींवर कार्यवाही होणारच
बालविवाह होऊ नये यासाठी कुटुंब, समाजानेही जागरूक असावे. बालविवाहामुळे अवेळी मातृत्व येते, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. यामुळे कायदेशीर वय झाल्यावरच लग्न झाले पाहिजे. जनसुनावणीत १६-१७ वर्षांच्या विवाहित मुली कौटुंबिक छळाच्या तक्रारी घेऊन आल्या, ग्रामसेवकांनी दिलेल्या जन्मदाखल्यात त्यांचे वय अधिक दाखवण्यात आले. हे गंभीर आहे. तसेच काही ठिकाणी लोकप्रतिनिधी अशा बालविवाहास उपस्थित राहतात, ४-२ मतांसाठी असे राजकारण कुणी करू नये.
बालविवाहप्रकरणी दोष सिद्ध झाल्यास सरपंच, ग्रामसेवक व पोलिस पाटील यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य सरकारला केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर कुणी दखल घेत नसेल तर थेट आयोगाकडे तक्रारी करा, असे आवाहन चाकणकर यांनी केले. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही चाकणकरांनी या वेळी दिली. तसेच सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.
दुपारी २.३० वाजेपर्यंत सुरूच होती सुनावणी
सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली सुनावणी २.३० वाजेपर्यंत सुरूच होती. त्यानंतरही तक्रारींचा ओघ कायम होता. अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून होत्या. यात कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, बालविवाह, विनयभंग, अत्याचार आदी प्रकरणांचा समावेश होता. स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस उपअधीक्षक कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, महिला तक्रार निवारण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयांत सातत्याने खेटे घालूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्यामुळे आपणासमोर दाद मागत असल्याचे महिला सांगत होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.