आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:कडधान्य लागवडीचा कालावधी पूर्ण, कपाशीसाठी हाती उरले वीस दिवस; कडधान्य लागवडीसाठी 15 जूनपर्यंत होता शास्त्रीय पद्धतीचा कालावधी

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम सुरू झाला असून अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात केवळ २७ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी, सोयाबीन अन् तुरीची लागवड झाली आहे. मूग, उडीद लागवडीसाठी १५ जूनपर्यंतच योग्य कालावधी असल्याने शेतकऱ्यांना लागवड करता येणार नाही. कपाशी लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या हाती वीस दिवस बाकी राहिले आहेत. सोयाबीन लागवडीसाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

पावसाची दडी अशीच कायम राहिल्यास कपाशी, मूग, उडीद या पिकांची लागवड थांबून याऐवजी इतर पिके लागवड करावी लागणार आहेत. जिल्ह्याचे चालू खरीप हंगामाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ६ लाख १४ हजार ८४३ हेक्टर असून चालू खरीप हंगामामध्ये आजपर्यंत कापूस २६ हजार ४१६ हेक्टर, सोयाबीन ६८७ हेक्टर आणि तूर ६८५ हेक्टरवर ठिबक व तुषार संचाची सोय असेल अशा ठिकाणी पेरणी झालेली आहे. चालू खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी पिकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. कृषी विभागामार्फत यापूर्वीच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करून नये असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. ठिबक सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी लागवड केली जात आहे. पाणी उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. या शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून दिला आहे.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा
जून तसेच जुलै महिन्यात पाऊस अत्यल्प राहिल्यास शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन करावे लागणार आहे. ज्याची शेतकरी निवड करतील अशा पिकांसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. म्हणजेच सोयाबीन लागवड होत असेल तर त्यात तुरीसारखे आंतरपीक घ्यावे किंवा तीळ, भुईमूग, बाजरी आदी पिकांची सांगड घालावी असा सल्ला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून देण्यात आला आहे.

आजपर्यंत एकूण सरासरी ४५.१० मिमी पाऊस
जिल्ह्यामध्ये १७ जून रोजीपर्यंत जालना तालुका ३७.९० मिमी, बदनापूर तालुका ५२.७० मिमी, भोकरदन तालुका ३३.३० मिमी,जाफराबाद तालुका ७०.८० मिमी, अंबड तालुका ५१.९० मिमी, मंठा तालुका ४९.६० मिमी, परतूर तालुका २२.३० मिमी, घनसावंगी तालुका ५०.३० मिमी याप्रमाणे जिल्ह्यामध्ये एकूण सरासरी ४५.१० मिमी इतका पाऊस झालेला आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा करावी
आजपर्यंत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता आपत्कालीन नियोजन करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करणे हाच पर्याय आहे. शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आंतरपिकाची तयारी ठेवावी, ज्यामुळे पुढील नुकसान टाळता येणार आहे.
- भीमराव रणदिवे, अधीक्षक कृषी अधिकारी, जालना

बातम्या आणखी आहेत...