आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲड. दिलीपसिंह ठाकूर यांचा उपक्रम:पुणेगावच्या जि.प. शाळेला शास्त्रज्ञांच्या प्रतिमा भेट

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुप्रिया ठाकूर यांच्या ११ व्या लग्न वाढदिवसानिमित्त त्यांचे चुलते सामाजिक कार्यकर्ते अॅड. दिलीपसिंह ठाकूर यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ, परमवीरचक्र विजेते सैनिक तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या ८५ प्रतिमा भेट दिल्या. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व शाळांमध्ये (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम) शास्त्रज्ञ व परमवीरचक्र विजेते यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. याला प्रतिसाद म्हणून अॅड. ठाकूर यांनी बुधवारी शाळेला प्रतिमा भेट दिल्या.

या वेळी मुख्याध्यापक बी. बी. गाढे, केंद्रप्रमुख विजय जाधव, कार्ला बीटचे विस्तार अधिकारी अशोक सोळुंके, इस्लामपूर शाळेचे मुख्याध्यापक ओम देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशवराव चुनखडे यांच्यासह प्रतिमा भेटकर्ते ॲड. दिलीपसिंह ठाकूर, समग्र शिक्षा अभियानचे समन्वयक राजेशसिंह ठाकूर, रितेशसिंह ठाकूर, शिक्षिका सुप्रिया ठाकूर, शैला बारगजे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गाढे यांनी केले, तर आभार ओम देशमुख यांनी मानले. दरम्यान, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासन निर्देशानुसार राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांचे जयंती दिन साजरे करण्यात येतात. याच धर्तीवर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये शास्त्रज्ञ व परमवीरचक्र विजेत्यांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभोवताली घडणाऱ्या घटनांबाबत कुतूहल, जिज्ञासा निर्माण व्हावी, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच महान शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्याची ओळख होऊन त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सैनिकांबद्दलची सन्मानाची भावना विकसित व्हावी, त्यांनाही परमवीरचक्र विजेते यांचे अतुलनीय योगदान कळावे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना विकसित व्हावी, या हेतूने परमवीरचक्र विजेत्यांची जयंती साजरी करण्याचा उद्देश यात समाविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिमा भेट दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापनाने आभार मानले.

उपक्रमाची अंमलबजावणी व्हावी
क्यूआर कोडच्या माध्यमातून शास्त्रज्ञ व परमवीरचक्र विजेत्यांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी उपलब्ध संदर्भग्रंथ, जीवनचरित्रांचा आधार घ्यावा. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी खात्री करावी, असे निर्देश जालना जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...