आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिले आहे.
तसेच, मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत मी पुन्हा एकदा जनतेची माफी मागतो, असेही दानवेंनी म्हटले आहे. रावसाहेब दानवेंनी व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली आहे.
अनावधानाने उल्लेख केला
रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे की, काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.
तेव्हाही माफी मागितली होती
रावसाहेब दानवे म्हणाले की, नाशिकचा 2 वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे.
राज्यभरात तीव्र पडसाद
छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आता भाजप ओमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान केले. लाड यांच्यापाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले. त्यामुळे दानवेंविरोधात राज्यात अनेक ठिकाणी शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. आज मराठा क्रांती मोर्चातर्फेही दानवेंविरोधात आंदोलन करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.