आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:विक्रमी पावसामुळे भूजल 2.96 मीटर वाढले, 10 गावांतच टंचाई; पहिला, दुसरा पाणीटंचाई आराखडा निरंक, तिसऱ्यात 50 टॅँकरचे नियोजन

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीच्या विक्रमी १२१८ मि.मी. पावसामुळे जालना जिल्हा पाणीदार झाला. यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च हे दोन्ही पाणीटंचाई आराखडे टँकर, विहीर-कुपनलिका अधिग्रहणात निरंक राहिले. एवढेच नव्हे तर मार्चअखेर भुजलपातळीत तब्बल २.९६ मीटरची वाढ नोंदवली गेली. याचाच परिणाम म्हणून जाफराबाद तालुक्यातील ९ व जालना तालुक्यातील १ वाडी वगळता एप्रिलअखेर जिल्ह्यात अन्यत्र टंचाई नाही. मात्र, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मे, जूनसाठी ५० टॅँकरचे नियोजन करून ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. जालना जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर (मोसमी व परतीचा मान्सून) या पाच महिन्यातील सरासरी पर्जन्यमान ६६३.२० मि.मी. असताना गतवर्षी प्रत्यक्ष १२१८ मि.मी. पाऊस पडला. अर्थात सरासरीहून ८३.६५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

वर्ष २०१९ व २०२० मध्येसुद्धा अनुक्रमे २३.८२ व ५७.३४ टक्के वाढ होती. सलग तीन वर्षे पावसाने सरासरी पार केल्यामुळे भुजलसाठ्यात वाढ होत गेली असून मागील वर्षांच्या तुलनेत यंदा २.९६ मीटरने पाणीपातळीत वाढ झाल्याचे चित्र भर उन्हाळ्यात ३१ मार्च रोजी पाहावयास मिळाले.

दहा गावांमध्ये टँकर, विहीर अधिग्रहण
जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा, भराडखेडा, रास्तळ व वानखेडा तर जालना तालुक्यातील सामनगाव ग्रामपंचायतीअंतर्गत गैबनशहा वाडीतील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या बरेाबरच जाफराबाद तालुक्यातील पाच गावांत पाणी राखीव साठी विहीर अधिगृहण करून पाणी दिले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दिली.

विविध उपक्रमांचा पडली भर, पाण्याची उपलब्धता
शासनाने वर्ष २०२६ ते २०१९ पर्यंत हाती घेतलेले जलयुक्त शिवार अभियान, सिमेंट साखळी बंधारे, मागेल त्याला शेततळे, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प आदी योजनांची अंमलबजावणी तसेच शेतीपिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, पाणीबचत व वापराबद्दल लोकांमध्ये आलेली जागृती याच्या संयुक्त परिणामामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून शेतकरीही काटकसर करत आहे.

चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीहून अधिक पावसाची हजेरी लागत आहे. गतवर्षी जिल्ह्यात एकूण १२१८ मि.मी. पाऊस पडल्याने नवा विक्रम झाला. यामुळे भुजलसाठ्यात २.९६ मीटरने वाढ झाल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले.
किरण कांबळे, वरिष्ठ भुवैज्ञानिक, जालना

बातम्या आणखी आहेत...