आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील राजूर परिसरातील चेनगाव, लोणगाव, ठिगळखेडा, खामखेडा, चांदई, पळसखेडा, तपोवन शिवारात होळीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ऐन सुगीच्या दिवसात रब्बीचा हंगाम चालू असताना हाती आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे, आंबा, डाळींब, मोसंबी, फुलशेती आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसाने निसर्गाच्या लहरीपणामुळे धिंगाणा घालत वादळी वाऱ्यासह शिमगा खेळल्यामुळे क्षणार्धात शेतकऱ्यांच्या स्वप्नाची होळी झाली आहे. रब्बीस मोठा फटका बसल्याने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वातावरण बदलाची माहिती हवामान विभागाकडून मिळाली परंतु सुगीचे दिवस असल्याने पिकांची कापणी, सोंगणीची कामे चालू होती. मजुरा अभावी उघड्यावर पडलेला माल शेतकऱ्यांस सुरक्षित ठिकाणी हलवता आला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरात सर्वच ठिकाणी द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, ज्वारी, गहू, तूर, हरभरा, मका भाजीपाला व फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्यांचा मोहरही गळून पडला आहे. ऐन उन्हाळ्यात सुगीच्या दिवसात अचानकपणे वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. योग्य मोबदल्या अभावी कापूस, सोयाबीन घरात पडून असल्याने शेतकरी आधीच हवालदिल असून परत रब्बी हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यास झोडपून काढले. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राजकीय नेत्यांच्या भूलथापा आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांस करावा लागत आहे. शेतात उभी असलेली व काढणीस आलेली पिक वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाचा उद्रेकही थांबायला तयार नाही. त्यामळे चोहोबाजूने कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.दरम्यान, दोन दिवसापासून शेतकरी आसमानी संकटाचा सामना करीत असून, शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. पंचनाम्यांचा फार्स करण्यापेक्षा तत्काळ मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवृत्ती शेवाळे यांनी केली.
शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करा
ऐन सुगीच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेली पिक भुईसपाट झाली. रब्बी हंगामाला मोठा फटका बसला. कष्टानं पिकविलेल्या मालाची माती झाली. कापूस आणि सोयाबीनला योग्य मोबदला मिळाला नाही. निसर्गाचा उद्रेकही थांबायला तयार नाही. शेतकरी चोहोबाजूने कोंडीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी. -प्रा.बाळासाहेब बोराडे, सामाजिक कार्यकर्ते, राजूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.