आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेहमीच गजबजलेला चौक अन् त्यात हातगाड्यांमुळे होणारे अतिक्रमण यामुळे अरुंद झालेला राजूर येथील चांदई चौक मागील वर्षभरापासून अपघाताचा पॉइंट ठरला होता. दररोज या ठिकाणी किरकोळ दोन ते तीन अपघात होणे ही नवी बाब राहिली नव्हती. दरम्यान, सोमवारी दुचाकी व ट्रकचा अपघात होऊन महिला ठार झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने येथील अतिक्रमण हटवले. त्यामुळे अनेक दिवसांपासून अपघात पॉइंट म्हणून ठरलेल्या चांदई एक्को चौकाने मंगळवारी मोकळा श्वास घेतला. तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र राजूर येथून मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या रस्त्यावर नियमित मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. या चांदई एक्को चौकात मुख्य बाजारपेठ आहे. हा चौक कायम गर्दीने गजबजलेला असतो.
या चौकातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला फळ, भाजीपाला व इतर वस्तूंच्या गाड्या असल्याने जळगावकडे तसेच चांदई एक्काेकडे वळणाऱ्या वाहनधारकांना अनेकदा थांबावे लागते. तर दुकानांमुळे रस्ताही नेहमीच अरुंद होतो. परिणामी दररोज अशी स्थिती असल्याने अपघाताचे प्रकार वाढले होते. अनेक वेळा वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे वाद उदभवले असून अपघातही झाले आहे. सोमवारी या चौकातील अरुंद रस्त्यामुळे जालन्याहून भोकरदनकडे जाणाऱ्या ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. आरेफाबी करीमशहा असे मृत महिलेचे नाव असून, मुबारक शहा जखमी झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे महिलेचा बळी घेतल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघाताचे प्रकरण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने याची दखल घेत मंगळवारी जेसीबीद्वारे रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या तसेच हातगाड्यांसाठीचे ओटे उद्ध्वस्त करून चौक मोकळा केला. यामुळे आता अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे.
रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाई
राजूर येथील मुख्य रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावरील दुकाने हटवण्यात आली असून, यापुढे रस्त्यावर दुकाने किंवा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. - संतोष घोडके, सहायक पोलिस निरीक्षक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.