आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:वाढत्या तापमानामुळे मिरची उत्पादकांना फटका, मिरचीची कोवळी रोपे करपू लागली; भोकरदन तालुक्यात 1200 हेक्टर उन्हाळी मिरची लागवड, कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी जवळजवळ बाराशे हेक्टरवर उन्हाळी मिरची लागवड केली आहे. परंतु दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे मिरचीची कोवळी रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

भोकरदन तालुक्यात जवळजवळ बाराशे हेक्टरवर उन्हाळी मिरची लागवड करण्यात आली असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. शिवाय बरेच शेतकरी शेतात मिरची लावण्यासाठी व्यस्त आहेत. तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, आन्वा, पारध, वालसांवगी, धावडा, हिसोडा, कोठा कोळी, करजगांव, कल्याणी, आडगांव, दहिगांव, धोंडखेडा, कोदा आदी भागातील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करतात. मल्चिंग पेपर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्‍चितच या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल अखेर व मे महिन्यात लागवड करत असतो.यावर्षी देखील शेतकऱ्यांनी मिरचीसाठी पाणी राखून ठेवत मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली आहे.

परंतु मागील काही दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने लागवड केलेली मिरचीचे कोवळी रोपे जागीच जळु लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दीड रुपया रोपाने शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे. त्यात अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसु लागली आहे. मिरचीचे रोप वाचविण्यासाठी शेतकरी दिवसापासून तीन ते चार वेळा मिरचीला पाणी देऊ लागला आहे. मागील वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. दरम्यान एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिकचा भर आहे. मागील वर्षी जवळपास सहा ते सात हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती. यंदा यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. दरवर्षी शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत मिरची लागवडीकडे वळला आहे. कमी खर्चात अधीक उत्पन्न मिरचीतुन निघत असल्याने शेतकरी लखपती बनले आहे. मागील वर्षी अतीपावसामुळे मिरची पिक खराब झाले होते. त्यामुळे मिरचीतुन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. यंदा माञ मागील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी मिरची लागवडीचे जोरात नियोजन करीत आसुन तालुक्यातील विविध रोपवाटीकेतुन विविध कंपनीचे रोप बुक करीत आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे रोपे सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...