आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दोघे जण हातात दगड घेऊन घराच्या दरवाजाजवळ थांबले. इतर तिघांनी घरात घुसून कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत कपाटातील ४० तोळे सोने व रोख १ लाख ४२ हजार रुपये काढून घेतले. ग्रामस्थ जागे झाल्याचे पाहताच बाजूच्या घरांना कड्या लावल्या. काही जण अापल्या दिशेने येत असल्याचे बघून त्यांच्यावर दगडफेक करीत दरोडेखोर पसार झाले. हा थरार घडला अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे गुरुवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास. वडीगोद्री येथील श्रीमंत तुकाराम खटके यांचा औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत खटके वस्तीत बंगला आहे. श्रीमंत खटके यांच्या घरी दिवाळी सणासाठी दोन मुली, नातवंडे आल्याने त्यांची पत्नी व मुली, नातवंडे बैठकीत झोपलेले होते. दरोडेखोरांनी शेजारी असलेल्या सर्व घरांच्या दरवाज्याच्या कड्या लावून घराच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून तीन दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून दोन दरोडेखोर चॅनल गेटजवळ दगडे घेऊन राखण राहिले. तर तीन दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. या प्रसंगी कुटुंबीय जागे झाले. दरोडेखोरांना पाहताच कुटुंबातील काही सदस्यांनी आरडाओरडा सुरू केली. परंतु, याचप्रसंगी काही दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत शांत केले. तसेच शेजारच्यांच्या घराच्याही कड्या लावल्या होत्या. दरम्यान, राजेंद्र खटके व विष्णुदास खटके यांनी मागील किचन रूमचे दरवाजे उघडून बाहेर आले बाहेर थांबलेल्या दोन दरोडेखोरांवर दगडांचा मारा केला. यामुळे चोरटे आत आले नाहीत. तोपर्यंत आतील दरोडेखोरांनी कपाटात दागिने पैसे ठेवले त्या रूममध्ये प्रवेश करून त्या रूममध्ये झोपलेल्या श्रीमंत खटके यांच्या सासूबाई गंगुबाई साहेबराव आटोळे यांना चाकूचा धाक दाखवून शांत बसवून त्यांच्या गळ्यातील, कानातील १ तोळे सोन्याचे दागिने तसेच, कपाट फोडून कपाटातील राणीहार, साडेचार तोळे, साडेतीन तोळ्याचे गंठण, २ गंठण, १२ अंगठ्या १५ तोळ्याचे, कानातील वेलदोडे ६ तसेच ५ तोळ्याचे ब्रासलेट, ३ तोळ्यांचे १ नेकलेस, सोन्याच्या ५ तोळ्यांच्या बांगड्या असे ४०तोळे सोने तसेच नगदी ऐवज १लाख ४२हजार रुपये कपाटातील कागदपत्रे घेऊन कपड्याचे गाठोडे बांधून सर्व दरोडेखोर बाहेर पडले. यानंतर त्यांनी उसाच्या शेतातून पळ काढला. दरम्यान, या प्रकाराची पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी परिसरातील नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेतला. परंतु, तोपर्यंत दरोडेखोर फरार झाले होते. घरातील सदस्यांवर शस्त्र उगारून ‘जगे से मत हिलो’ म्हणत दरोडेखोरांनी केली लूटमार दिवाळी व भाऊबीजेसाठी श्रीमंत खटके यांच्या दोन मुली आणि नातवंडे घरी आलेले होते. दरोडेखोर घरात प्रवेश करून जेथे हे सगळे झोपले होते तेथे दरोडेखोर आल्यानंतर मोठ्या मुलीला जाग आल्यामुळे तिने जोरजोरात ओरडण्यास सुरवात केली. या मुळे झोपलेले सगळे लहान-मोठे लोक जागे झाले. पण समोर एक जण हातात चाकूचा धाक दाखवून हिलो मत असं म्हणून तो तिथंच थांबला आणि पाठीमागून दोन दरोडेखोर येऊन बाजूला असलेल्या कपाटाच्या खोलीकडे जात असताना खटके यांची मोठी मुलगी आरती यांनी त्यांना रोखण्यासाठी त्या खोलीचा दरवाजा बंद करत असताना त्या झटापटीत आरती यांच्या हाताला जखम झाली.
लवकरच आरोपी जेरबंद होतील
दरोड्याच्या घटनेवरून दरोडेखोरांचा अंदाज बांधला आहे फक्त खात्री होताच आरोपींना अटक करण्यात येईल यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली असल्याचे अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सांगितले.
कागदपत्रे सापडली उसाच्या शेतात
घरात एकमेकांजवळ असलेले दोन कपाट नवे कपाट फोडून त्या मधील सोने लंपास केला. मात्र जुन्या कपाटाला हात सुद्धा लावला नाही हे विशेष. कपाटातील कागदपत्रे उसाच्या शेतात फेकून देऊन सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. दरम्यान, याच रात्री श्रीकांत विठ्ठल कोकणे यांच्या घराच्या वरती राहणाऱ्या मजुराचे १२०० रुपये तसेच एक मोबाइल लंपास केला. तर श्रीकांत कोकणे यांच्या घराच्या बाजूच्या लोकांच्या घराच्या कड्या लावल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.