आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:आरटीई प्रक्रिया संपली, 8 जिल्ह्यांतील पाच हजारांवर जागा रिक्तच ; बड्या इंग्रजी शाळांची टाेलवाटाेलवी

जालना / प्रताप गाढेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीई कोट्यासाठी मराठवाड्यातील एकूण १८९० खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पात्र असून १५ हजार ५६५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. आतापर्यंत १० हजार ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून यातील ५ हजार २४९ जागा रिक्तच आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने प्रक्रिया राबवून त्यास आता ब्रेक देण्यात आला आहे. प्रक्रिया संपली असून आठ जिल्ह्यांत तब्बल ५ हजार २४९ जागा अद्याप रिक्त राहणार असल्याची बाब पुढे आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येतेे. त्यानुसार वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ३० मार्च रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे काढण्यात आली. ४ एप्रिलपासून पोर्टलवर निवड व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. लॉटरीनंतर केवळ प्रतीक्षा फेऱ्यांचा निर्णय जाहीर झाला. मराठवाड्यात १५, ५६५ विद्यार्थ्यांची निवड यादी आरटीई पोर्टलवर जाहीर झाली. यानुसार निवडलेले तसेच प्रतीक्षा यादीनुसार पुढील प्रक्रिया हाती घेण्यात आली. शाळा, पालकांकडून होणारी दिरंगाई यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब लागला. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पहिली मुदतवाढ २० एप्रिल, दुसरी १० मे रोजी, त्यानंतर प्रतीक्षा यादीला मुदतवाढ देत प्रक्रिया राबवण्यात आली.

विशिष्ट शाळाच मिळण्याच्या हट्टाने लांबते प्रक्रिया
आपल्या पाल्याला आरटीई कोट्यातून ठराविक इंग्रजी शाळेतच प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही राहतात. परिणामी शाळांची निवड करताना वेगवेगळ्या शाळांचा पर्याय दिला जातो. अपेक्षित नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश मिळाल्यास पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. वेळोवेळी दिली जाणारी मुदतवाढ यामुळे प्रतीक्षा यादीतील पालकांचा हिरमोड होऊन ते पर्याय म्हणून जवळच्या शाळेत प्रवेश घेतात. प्रक्रियेला जेवढा विलंब होतो तेवढा पालकांचा अपेक्षाभंग होतो, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठरावीक कालावधीत मिळते पालकांना संधी
राज्यात एकाच वेळी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते. याबाबतीत राज्यस्तरावरून निर्णय घेतले जातात. ठराविक कालावधीत शाळा, पालकांना संधी मिळते. आता प्रक्रियाच थांबवण्यात आली आहे.
कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, जालना

बातम्या आणखी आहेत...