आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे दुर्लक्ष:दिवाळीपासून धावडेकर अंधारात; सहा सिंगल फेज, एक मोठे रोहित्र जळाले, दुरुस्ती होईना

धावडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथे एकूण ७ रोहित्र आहेत. यापैकी एक १०० केव्ही तर इतर ठिकाणी सिंगल फेजचे रोहित्र आहे. सिंगल फेजचे सहा रोहित्र तसेच १०० केव्ही क्षमतेचे रेाहित्र दुरूस्तीसाठी अनेक दिवसांपासून जालना येथे पाठवण्यात आले आहे. मात्र, रोहित्र मिळत नसल्याने सोमवारी ग्रामस्थांनी थेट उपकेंद्रावर आंदोलन करून टाळे लावण्याचा प्रयत्न केला. पारध पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गुरुवार (दि.१०) पर्यंत धावडेकर ग्रामस्थांनी माघार घेतली आहे.

मराठवाडा तसेच खान्देश, विदर्भ या सिमेवर असणाऱ्या भोकरदन तालुक्यातील धावडा या गावची संख्या १५ ते २० हजारांवर पोहचली आहे. मोठ्या प्रमाणात विस्तार झालेल्या गावाला विजपुरवठा करण्यासाठी विविध भागात एकूण सात रोहित्र देण्यात आले आहे. यापैकी सहा सिंगल फेजचे आहेत. महिनाभरापासून सिंगल फेजचे सहा रोहित्र, तर १०० क्षमतेचा एक असे सात रोहित्र नादुरूस्त झाले आहेत. ते दुरूस्ती करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून सुरू आहे. मात्र, ऐन दिवाळीपासून धावडा गावात भाग बदलून विजपुरवठा गुल होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत.

दरम्यान, सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी सरपंच गंगूबाई बोराडे, उपसरपंच ईकबाल पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकण्यासाठी उपकेंद्र गाठले. दरम्यान, पारध पोालिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांनी ग्रामस्थांबरेाबर चर्चा करून भोकरदन येथील सहाय्यक अभियंता दीपक तुरे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर वरीष्ठांबरेाबर चर्चा केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून गुरूवारी रोहित्र देण्यात येईल, असे सांगितले. यानंतर ग्रामस्थांनी दोन तासानंतर गोंधळ थांबवून गुरूवार पर्यंत वाट पाहणार असल्याचे सांगुन प्रकरण शांत केले. यावेळी पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांच्यासह पोलिस तसेच महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येथील उपकेंद्राला कायम उपअभियंता द्यावे ज्यामुळे वीज वितरणच्या समस्या सुटतील. शिवाय धावडा गावासाठी अतिरीक्त रोहित्र देत वाढलेला विजेचा भार कमी करावा, अशी मागणी यावेळी सरपंच गंगुबाई बोराडे, उपसरपंच इक्बाल पठाण, चेअरमन डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य सुगरणबाई खैरे, द्वारकाबाई निकाळजे, सदस्य दिलीप वाघ, विलास भडगे, धनंजय तबडे, रामराव पवार, दिनेश देवकर, तुकाराम बोराडे, अमोल देशमुख, विलास महाराज, नरेंद्र फूसे, शेख सुलेमान, संजय धनवई यांनी केली.

...तर उपकेंद्रावर आंदोलन करू, गुरुवारची प्रतीक्षा
सण उत्सवाचे दिवस सुरू असून मागील महिनाभरापासून धावडा गावात ग्रामस्थांना अंधारात रहावे लागत आहे. अनेकदान जालना येथील कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र, अधिकारी भेटत नाही. आता या समस्येला आम्ही वैतागलो आहोत. आम्हाला गुरुवारपर्यंत महावितरणने रोहित्र दिले नाही, तर पुर्ण उपकेंद्र बंद करू. शिवाय या ठिकाणी आंदोलनही करण्यात येईल, वरिष्ठांनी याबाबीची नोंद घेणे गरजेचे आहे. -इक्बाल पठाण, उपसरपंच, धावडा

बातम्या आणखी आहेत...