आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॅशन डिझायनर तसेच कपडा उद्योगातील शिक्षण पूर्ण करून ग्रामीण कलाकृतीला चालना देण्यासाठी जालन्याच्या तरुणीने काही वेगळे करण्याचा मानस ठेवत महाराष्ट्रीयन परंपरेची ओळख, कलाकुसर कपड्यांवर देण्याला २०२१ मध्ये सुरूवात केली. कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झालेल्या स्थितीत ऑनलाइन प्रचाराची जोड मिळाली. विविध संकटावर मात करून जिद्द तसेच मेहनतीच्या बळावर जालन्यातील रेवती काकड या तरुणीने साता समुद्रापार ग्रामीण कला पाेहाेचवली आहे. आज मलेशिया, कॅनडा, अाफ्रिका या देशांत रेवतीच्या भरतकाम, नक्षीकाम ही कलाकुसर केलेल्या साड्या, ब्लाऊज पाेहाेचवत आहेत. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण करून जालन्यात परतलेल्या रेवती काकड हिने महाराष्ट्रीयन ओळख तसेच ग्रामीण महिलांची कलाकुसर जगाला कळावी हे ध्येय ठरून महिलांना कसा रोजगार देता येईल यासाठी १ डिसेंबर २०२१ मध्ये कामाला सुरूवात केली.
साडी, ब्लाऊज यावर कशा प्रकारे महाराष्ट्रीयन ओळख देता येईल यावर विविध संस्कृतीचा अभ्यास केला. यासाठी नक्षीकाम करणाऱ्या महिला तसेच पुरूषांची निवड करून मागणीप्रमाणे भरतकाम, नक्षीकाम केलेले वस्त्र सातासमुद्रापार पोहोचवत आहे. जालन्यातील जवळपास ३० महिलांना या तरुणीने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज २ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली कलाकुसर सर्वत्र पसरवत आहे. महाराष्ट्रीयन कलेला सातासमुद्रापार पाेहाेचवणारी तरुणी ही जालनेकर युवतींसाठी राेल मॉडेल ठरत आहे. दरम्यान, तरूणी, महिलांना कलाकुसरची कला अवगत असेल तर त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे रेवती काकड हिने सांगितले. जिल्हाभरातील तरुणींनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्रीयन कलेस मागणी
आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आपली ओळख आहे. ही कलाआजच्या काळातफॅशनच्यामाध्यमातून देण्याचेकाम केले जातआहे. शिवायमहिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे. आंध्रप्रदेश, चेन्नई, कोईंबतूर, हैदराबाद, गोवा पाँडिचरी तसेच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणाहूनही डिझाईन केलेल्या कपड्यांना मागणी होत आहे. - रेवती काकड, जालना
कोरोनामुळे ऑनलाईन प्रचाराचे धडे
कलाकुसर च्या कामाला १ डिसेंबर रोजी २०२१ रोजी सुरूवात केली. तीन महिन्यांतच कोरोनाचा कहर वाढल्याने लॉकडाऊन लागले. यामुळे पूर्णपणे बंद पडलेली कला सर्वांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत ऑनलाईन प्रचाराची सुरूवात केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.