आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज मिळेना:शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतनाची घोषणाच; सणासाठी कर्जही मिळेना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपूर्वीच राज्यातील शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ आठ जिल्ह्यांसाठी मर्यादित राहिला. राज्य शासनाच्या या दिवाळीपूर्वी वेतनाची घोषणा म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी गत झाली. राज्यातील ३६ पैकी २८ जिल्ह्यांतील शिक्षकांच्या हाती वेतन आले नाही.

राज्य शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर ‍कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचा निर्णय १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता. या वेतनासाठी पुरेशी आर्थिक तरतूद जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली नाही. राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषद यासह खासगी अनुदानित शाळांमधील वेतन अनुदान जिल्हास्तरावर वर्ग करताना जवळपास ५० ते ६० टक्के रक्कम पाठवली गेली. यामुळे दिवाळी वेतन अदा करणे शक्य झालेले नाही. सण कर्ज म्हणून मिळणारे दिवाळी सण कर्ज दिवाळी होऊनदेखील अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांना मिळाले नाही.

ज्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे वेतन झाले आहे त्या जिल्ह्यांमध्ये पूर्वी असलेली तरतूद वापरात येऊन तेथील शिक्षकांचे वेतन करण्यात आले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये प्राप्त वेतन तरतुदीनुसार काही तालुक्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. काही तालुके अजूनही वेतनासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी जवळपास २८ जिल्हे हे दिवाळीपूर्वी वेतनापासून वंचित आहेत. या जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन तत्काळ निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वेतन तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्यासह अमोल तोंडे, संजय हेरकर, बी. आर काळे, दत्तात्रय पुरी, योगेश झांबरे यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आठ जिल्ह्यांतील शिक्षकांना दिलासा सातारा, नागपूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन जुन्या तरतुदीत शिल्लक रक्कम असल्याकारणाने अदा करण्यात आले आहे, तर बीड, वाशिम, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन प्राप्त तरतुदीनुसार काही तालुक्यांचेच वेतन करण्यात आले आहे.

वेतनाची तरतूद झाली नाही
दिवाळी सणापूर्वी वेतन अदा करण्याची घोषणा वेतन तरतुदीअभावी पूर्ण होऊ शकली नाही. शिवाय दिवाळी सण कर्जदेखील बहुतांश शिक्षकांना उपलब्ध झाले नाही. शासनाने याची दखल घेऊन लवकर वेतन तरतूद करून देयके निकाली काढावीत. - संतोष राजगुरू, अध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना

बातम्या आणखी आहेत...