आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची वसुली २.५७ टक्के:वर्षाला 34 कर्मचाऱ्यांना दीड काेटीचे वेतन, करवसुली केवळ 70 लाख लहू गाढे

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता, शिक्षण, पाणी यासह विविध कर वेळेवर गोळा झाल्यास या रकमेतून पालिका प्रशासनाला विविध विकासकामे करता येतात. करवसुलीसाठी पालिका प्रशासनाने विशेष वसुली अधिकारी, कर अधिकारी, कर निरीक्षक, वसुली लिपिक, चार जवान अशा ३४ जणांची वसुलीसाठी नियुक्ती केली आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी दीड कोटींचा खर्च होत आहे. वसुलीसाठी भाडेतत्त्वावर वाहनेही लावण्यात आली आहेत. दरम्यान, ७० कोटी ३ लाख ५ हजारांची थकबाकी आहे. यात केवळ ७२ लाख ७१ हजार रुपयांची वसुली झाली आहे.

नगरपालिकेच्या तिजोरीत कराच्या उत्पन्नातून कोट्यवधी रुपये येतात. या उत्पन्नातून शहरात विविध विकासकामे केली जातात. मात्र, जालना नगरपालिकेची करवसुली वर्षानुवर्षे थकीत राहत आहे. करवसुलीचे प्रमाण कमी असल्याने शहरातील कामांवरही परिणाम होत आहे. मार्चअखेर करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठण्याकरिता नगरपालिकेच्या कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. सन २०१८-१९ मध्ये मालमत्तांचे फेरमूल्यांकन झाले असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना नवीन कर मान्य नसल्यामुळे काहींनी ३० टक्के रक्कम भरणा करून अपील सादर केले आहे. परंतु, अपिलाची कामेही बहुतांश प्रमाणात रेंगाळली होती. नोटिसा दिल्यानंतर नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वर्षानुवर्षे अनेक थकबाकीदार राहत आहेत. जालना शहरात रहिवासी असलेल्या ४८ हजार ७३१ मालमत्ता आहेत. त्यात वाणिज्य ८३८१, शासकीय १४२, इतर ९०३३ अशा ६६२८७ मालमत्ता आहेत.

अशी आहे थकबाकी
मागील काही वर्षांतील विविध करांपोटी १०० कोटी ६७ लाख १७ हजार रुपयांची थकबाकी आहे. यात केवळ २ कोटी ५८ लाख रुपये वसूल झाले आहेत. तर चालू वर्षातील ३० कोटींची थकबाकी असून केवळ ७२ लाख ७१ हजार रुपयेच पथकाला वसूल करता आले आहेत. वसुलीचे प्रमाण केवळ २.५७ टक्के असल्याने कधी वसुली होणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

नोटिसानंतर वाढतो वसुलीचा वेग
मार्च एंड आला की करवसुली विभागाकडून नोटिसा काढून मोठ्या थकबाकीदारांचा अहवाल करून वसुलीसाठी सकाळ ते सायंकाळ असे नियोजन केले जाते. दरम्यान, नोटिसा काढण्याचे काम सुरू असून अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचीही कारवाई केली जाणार आहे.

वसुलीसाठी खासगी वाहनेही दिमतीला
थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी खासगी वाहने लावली आहेत. या वाहनांसाठीही लाखो रुपयांचा खर्च पालिकेकडून केला जात आहे. जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन मोहीम राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...