आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. ठिबक, सूक्ष्म सिंचनाद्वारे बागायती क्षेत्रातील बहुतांश शेत व पूर्वहंगामी कापूस पिकाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. मागील काही वर्षांपासून कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे हे पीक १२० दिवसांतच घ्यावे लागणार आहे. या पिकाचे जिल्हाभरात एकात्मिक कीड व्यवस्थापन व्हावे म्हणून १ जूननंतरच शेतकऱ्यांना बीटीचे बियाणे देण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जून महिन्याच्या १ तारखेपूर्वी बीटी विक्रीची पावती फाडली त्या विक्रेत्याविरोधात कारवाई होणार आहे.
जिल्ह्यात या वर्षी खरिपात २ लाख ५७ हजार ८३३ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. यासाठी जिल्ह्यात कपाशी बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, ठरावीक काळातच कपाशीचे उत्पन्न घेतले जावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी जिल्ह्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन हे कपाशीसाठी लागू केले असून यासाठी कृषी निविष्ठा विक्रेते, जिल्हाभरातील कृषी विभागाची यंत्रणा, कृषी सेवक अशा सर्वांना याबाबतचे नियोजन देण्यात आले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
याला प्रतिबंध करण्यासाठी एकाच वेळी कपाशी लागवड करणे, औषधींच्या फवारणीचे नियोजन देणे अशी कामेही याअंतर्गत केली जाणार आहेत. याशिवाय मागील वर्षी जिल्ह्यातील बागायती क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी कापसाची पूर्वहंगामी लागवड केली तेथे कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले होते. मागील काही वर्षांपासून मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे जमिनीचे तापमान वाढत आहे. पूर्वीच्या काळात पूर्वहंगामी लागवड जमिनीस मोकाट सिंचन पद्धतीने पाणी देऊन होत असल्याने जमिनीचे तापमान कमी होऊन बियाण्याची उगवण व मुळांची वाढ योग्य होत होती. परंतु ठिबकच्या उपलब्धतेनुसार बहुतांश शेतकरी आता पूर्वहंगामी लागवडीसाठी पहिले पाणी मोकाट पद्धतीने न देता ठिबकवर पूर्वहंगामी लागवड करत आहेत. यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार होत नाही. यामुळे कापसाची उगवण व मुळाच्या वाढीवर परिणामकारक ठरते.
लागवड मागेपुढे झाल्यास बोंडअळीवर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कपाशी लागवडीचे नियोजन तंतोतंत करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता ७ जूननंतरच लागवड करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनाला हातभार लागणार आहे. यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाही कृषी विभागाकडून वेळेत बियाणे विक्री करण्याबाबत तंबी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.