आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक बदल:वाळूला पर्याय सँड क्रश; पर्यावरण रक्षणार्थ पूरक अन् मिळेल चौपट स्वस्त!

जालना / कृष्णा तिडके17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नद्यांतून वाळूचा होणारा बेसुमार उपसा, पर्यावरणाचे नुकसान आणि वाळूची टंचाई पाहता जालना येथील उद्योजक नितीन काबरा यांनी नैसर्गिक वाळूला सँड क्रशच्या रूपाने पर्याय शोधला आहे. जालना येथील उद्योजक रोज २५० टन सँड क्रशचे उत्पादन करत आहेत. नदीतून मिळवल्या जाणाऱ्या वाळूपेक्षा गुणवत्तेत ही कृत्रिम वाळू अनेक पटींनी उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या ताज्या संशोधनातही ही कृत्रिम वाळू अतिशय दर्जेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जालना एमआयडीसीच्या २५ कंपन्यांमध्ये दररोज ८ ते १० हजार टन सळयांचे उत्पादन केले जाते. भंगार वितळवल्यानंतर लोखंडावर मातीमिश्रित स्लॅग तयार होतो. याचा काेणताही वापर होत नसल्याने कारखानदार हा स्लॅग फेकून देत होते. त्यातून औद्योगिक वसाहतीच्या डंपिंग यार्डवर मोठमोठे ढीग तयार झाले होते. ही समस्या दूर करण्यासाठी स्टील उद्योजक नितीन काबरा यांनी या वेस्टपासून वाळू तयार करता येईल का, याची चाचपणी २००७ मध्ये सुरू केली. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर त्यांना यात यश आले. ही क्रश स्लॅग तयार केल्यानंतर काबरा यांनी प्रथम स्वत:च्या कारखान्याच्या इमारत बांधकामात या वाळूचा वापर केला. त्यामुळे इतर उद्योजकांनीही प्रेरणा घेतली आणि आज सुमारे २५ कंपन्या या कृत्रिम वाळूचे उत्पादन करीत आहेत. संपूर्ण जालना शहराच्या एक वर्षाच्या बांधकामाची गरज भागेल इतकी क्रश सँड सध्या जालना औद्योगिक वसाहतीत उपलब्ध आहे. शहरातील अनेक मोठ्या बांधकामात सध्या या वाळूचा वापर होतो आहे. काबरा म्हणाले की, आम्ही स्वत: बांधकामात या क्रश स्लॅग सँडचा वापर केला आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात मोठी बचत झाली. शिवाय कारखान्यातून जे वेस्ट बाहेर पडत हाेते त्यातून आम्ही उत्तम प्रकारचे बायप्रॉडक्ट तयार करू शकलो. आता प्रत्येक कारखानदार ही सँड तयार करीत आहे.

नदीतल्या वाळूपेक्षा मजबूत व स्वस्त : नदीतल्या वाळूमध्ये काळी माती असते. बांधकामात ही काळी माती आली तर पाणी लागल्यावर काळी माती फुगते व त्यामुळे बांधकाम तडकते. क्रश सँडमध्ये काळ्या मातीचे प्रमाण शून्य आहे. त्यामुळे क्रश सँड नदीतल्या वाळूपेक्षा अधिक मजबूत आहे. नदीतली वाळू जवळपास एक हजार ते १६०० रुपये टन आहे. त्या तुलनेत क्रश स्लॅग सँड स्वस्त असून ४०० रुपये टन आहे. या वाळूच्या गुणवत्तेवर आयआयटी कानपूरनेही शिक्कामोर्तब केले आहे. नदीतील वाळूपेक्षा ही कृत्रिम वाळू अधिक दर्जेदार असल्याचे निरिक्षण आयआयटी कानपूरने नोंदवले आहे. जालना येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातही या कृत्रिम वाळूची गुणवत्ता तपासली गेली.

क्रश सँड सर्वोत्तम वाळू
आम्ही स्वत: बांधकामात या क्रश स्लॅग सँडचा वापर केला आहे. त्यातून आमच्या बांधकाम खर्चात मोठी बचत झाली. शिवाय कारखान्यातून जे वेस्ट बाहेर पडत हाेते त्यातून आम्ही उत्तम बायप्रॉडक्ट तयार करू शकलो.
- नितीन काबरा,संचालक, भाग्यलक्ष्मी स्टील,जालना.

सँड क्रशमुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये वाढ : संशोधन
आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकत्याच झालेल्या संशोधनात सामान्य वाळूच्या तुलनेत सँड क्रश अधिक चांगली असल्याचे म्हटले गेले. अॅडव्हान्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार नैसर्गिक वाळू आणि काँक्रीटच्या तुलनेत सँड क्रशपासून तयार क्युबमध्ये काँप्रेसिव्ह स्ट्रेंथ अधिक आढळली आहे. अबुझा (नायजेरिया) येथील बेझ युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात म्हटले की, सँड क्रश सर्व बांधकामात वापरली जाऊ शकते. याशिवाय १०% ते २०% सँड क्रशच्या वापरामुळे आणखी चांगली बांधकाम गुणवत्ता मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...