आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील जनतेला पुरेशी, गुणात्मक सेवा देण्याचे आपले ध्येय असल्याचे राज्याचा आरोग्य विभाग सांगतो. त्यासाठी अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचाराचे दावे केले जात आहे. दुसरीकडे किरकोळ आजारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तपासणी नंतर औषधींसाठी खासगी मेडिकलचा रस्ता दाखवला जातो आहे. त्यामुळे गरिबांचा खिसा कापला जात आहे. दिव्य मराठीने महिनाभर दररोज काही वेळ जिल्हा रुग्णालयासमोरील मेडिकलसमोर थांबून पाहणी केली असता हे चित्र समोर आले. जिल्हा रुगणालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज जवळपास ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येतात. तर अंतर्गत विभागात भरती होण्यासाठीही दररोज जवळपास ३०-४० रुग्ण येत असतात.
किरकोळ खर्चाचा अपवाद वगळता जवळपास मोफत उपचार होत असल्याने जिल्हाभरातील गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी वर्गातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. संबधित डॉक्टर तपासणी करुन रुग्णांना याच चिठ्ठीवर औषधी लिहून देतात. परंतू, जी औषधी डॉक्टर लिहून देतात त्यापैकी बहूतांशी औषधी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाइलाजास्तव रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील मेडिकल मधून घेऊन येण्याचे सांगितले जात आहे. जर एखादे औषध जिल्हा रुग्णालयाच्या औषध भंडारात उपलब्ध नसेल तर त्यासारखाच कंटेंट असलेले दुसरे औषध तरी याच रुग्णालयातून दिले जाऊ शकते. मात्र तसे न करता थेट खासगी मेडिकल मधूनच खरेदी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिली जाते.
बाहेरून आणायला सांगितलेली औषधी..
सेट्रीझ टॅब्लेट,टॅक्सीम ओ,अॅस्कोरील कफ सायरप, ओरोफर टॅब, पॅसीमॉल ५००, अॅसीलॉक आर.डी.,व्हायबॅक कॅप्सूल, डायटॉल प्लस, सोबायसीस फोर्ट, रिग्लान, ऑमी कॅप्सूल, सिटाल सायरप, व्हिबेट, डायटोझ, रेग्युल्ट,सॅबेसी, एफ.एम.एल. आय ड्रॉप, ओलोपॉट आय ड्रॉप, इकोटीअर्स आयड्रॉप आदी औषधी बाहेरुन आणायला सांगितली गेली. नेत्र, त्वचा, कान-नाक-घसा, अस्थिव्यंग, मेडिसीन आदी विभागातील औषधींचा यात समावेश आहे.
रुग्णांना दिली जाते स्वतंत्रपणे एक छोटी चिठ्ठी
जी औषधी बाहेरील मेडिकल मधून आणायला सांगितली जातात त्यासाठी स्वतंत्रपणे एक छोटी वेगळी चिठ्ठी लिहून दिली जाते. दोन्ही चिठ्ठ्यांवरची नावे सारखीच असतात. खासगी मेडिकल मधून औषधी आणण्यासाठी जी चिठ्ठी दिली जाते त्यावर डॉक्टर सही करत नाहीत. तर काही वेळा एखादे औषध बाहेरुन आणायला सांगितले जाते त्याचे नाव केस पेपरच्या पाठीमागील बाजूस लिहले जाते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसलेंना थेट सवाल
Q. जिल्हा रुगणालयातील डॉक्टरांनी खासगी मेडिकलमधून आणायला सांगितलेल्या औषधांचे काही प्रिस्क्रिप्शन आपणास पाठवली आहेत, ही औषधी आपल्याकडे उपलब्ध नाहीत का? - कोणत्याही रुग्णाला बाहेरुन औषधी घ्यावी लागत नाहीत. औषधी उपलब्ध नाहीत हे मला अद्याप कुणी कळवलेले नाही. अतिरिक्त शल्यकित्सक हे काम बघतात त्यांच्याशी चर्चा करुन हा विषय मार्गी लावते.
Q. खोकल्याची औषधी, पित्ताच्या गोळ्या, आयड्रॉप अशी साधी औषधीही बाहेरुन का घ्यावी लागत आहेत? - मी प्रत्येक विभागातील डॉक्टरांशी चर्चा करते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलते. रुग्णांना बाहेरुन औषधी आणावी लागणार नाहीच याची काळजी घेऊ.
Q. डॉक्टर्स साध्या चिठ्ठीवर ही औषधी लिहून देतात याला प्रिस्क्रिप्शन म्हणता येईल का? - नाही साध्या चिठ्ठीला प्रिस्क्रिप्शन म्हणता येणार नाही. तशी औषधी देता येत नाहीत. हा काय प्रकार आहे याची माहिती घेते.
गावातला खासगी डॉक्टरच बरा
बहिणीला घेऊन रुगणालयात आलाे होतो. त्यांनी काही औषधी दवाखान्यातून दिली आणि काही औषधी बाहेरुन आणायला सांगितले. मोफत उपचार व औषधी मिळतात म्हणून इतक्या दूरवरून खर्च करुन येथे येतो. येथे आल्यावरही औषधांसाठी खर्च करावा लागत असेल तर गावातच खासगी डॉक्टरकडे गेलेले बरे असे वाटते आहे. - मच्छिंद्र काळे, सेवली, ता.मंठा, रुग्णाचे नातेवाईक
डॉक्टर म्हणतात, औषधी नाहीच तर कुठून देणार?
माझे वडिल अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. दवाखान्यातून काही औषधे मोफत दिली, मात्र रात्रीपासून दोनवेळा बाहेरुन औषधी आणण्याचे सांगण्यात आले. औषधी द्या म्हणून डॉक्टर व नर्स यांच्याशी वाद घातला.औषधी नाहीच तर कुठून देणार असा उलट प्रश्न त्यांनी केला. -सय्यद नजीर, रुग्णाचे नातेवाईक, देऊळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.