आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरुग्ण:क्षयरुग्णांची 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान शोधमोहीम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी १३ ते ३० सप्टेंबरदरम्यान कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम राबवली जाणार आहे. याचे सूक्ष्म नियोजन करून ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

कुष्ठरुग्ण शोधमोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. राठोड बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. एस. डी. गावंडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. बी. जगताप, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. अभिजित शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी एन. ए. सोनकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. राठोड म्हणाले, समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार करणे तसेच क्षयरोगाच्या निदानापासून वंचित असलेल्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरेने उपचार करण्यासाठी या शोधमोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेचे जिल्हा, तालुका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. घरोघरी भेटी देऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. प्रत्येक पथकाला रुग्णशोध तसेच उपचाराचे दर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात यावे. जनमानसामध्ये असलेले गैरसमज दूर करून या आजाराची लक्षणे तसेच उपचाराबाबत सर्वदूर जनजागृती करण्यात यावी. शाळांच्या माध्यमातून प्रभातफेरी, पोस्टर्स, बॅनर, गावामध्ये दवंडी, ग्रामसभा, आकाशवाणी तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात यावी. वर्ष २०२५ पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही डॉ. राठोड यांनी या वेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...