आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रद्धांजली:सायकलची चाकं थांबतील, त्या दिवशी माझं जीवन थांबेल! प्रख्यात शायर शम्स जालनवी कालवश

कृष्णा तिडके | जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र जावेद तांबोली यांच्या संग्रहातून
  • शब्दांनी श्रीमंत, पण वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत सायकलवरून वितरित केली वर्तमानपत्रे

आपल्या शायरीने देशभरात जालना शहराला वेगळी ओळख निर्माण करून देणारे शायर शम्स जालनवी (९४) यांचे सोमवारी पहाटे ५.३० वाजता निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत ते सायकलवर फिरून उर्दू वर्तमानपत्र वितरित करत. “ज्या दिवशी माझ्या सायकलाचे चाक थांबेल त्या दिवशी माझे जीवन थांबेल,’ असे ते म्हणायचे.

कडाऊनमुळे गेल्या ४ महिन्यांपासून काम नसल्यामुळे ते घरातच बसून होते आणि दुर्दैवाने त्यांचा शब्द खरा ठरला. शमशुद्दीन मोहंमद फाजील अन्सारी ऊर्फ शम्स जालनवी यांना अगदी शालेय जीवनापासून शायरीचे वेड होते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. शकील बदायूनी, नौशाद, गुलजार आदी नामवंत शायरांसोबत शम्स यांनी गझल सादर केल्या. आपल्या शायरीतून त्यांनी वास्तव परिस्थितीचे चित्र मांडले. त्याशिवाय त्यांनी जे पाहिलं, जे जगलं, जे भोगलं तेच आपल्या शायरीतून मांडलं.

तहहयात सायकलच्या चाकावर जगले जीवन

शम्स जालनवी यांनी देशभरात अनेक मुशायरे आणि मैफिली गाजवल्या. मात्र जालना शहरात सायकलवरून वर्तमानपत्र वितरणाचे काम त्यांनी कधीही थांबवले नाही. इतका मोठा शायर पेपर वाटतो, हे आपल्या शहरासाठी भूषणवाह नाही असे म्हणत आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांना स्कूटर किंवा मोपेड देऊ केली होती. मात्र शम्स जालनवींनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले होते, जोपर्यंत माझ्या सायकलचे चाक फिरत राहील तोपर्यंत माझे जीवन सुरू राहील...

वाजपेयींनी केले होते कौतुक :

पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर मुशायरा आयोजित केला होता. यात देशभरातील नामवंत शायर हजर होते. “आपके विलक्षण प्रतिभा से मैं प्रभावित हुआ हूं,’ असे म्हणत वाजपेयींनी शम्स यांंचे तोंडभरून कौतुक केले होते.

जालन्यातून दहावी, फाळणी होण्याआधी लाहोरमधून पदवी : 

केस वाढलेले, पांढरी दाढी, मळालेला पांढरा झब्बा, त्यावर काळ्या रंगाचा बटण नसलेला शर्ट आणि पांढरा पायजमा असा शम्स यांचा पेहराव. सन १९२६ मध्ये जालना शहरात जन्मलेले शम्स १९४२ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. फाळणीपूर्वी लाहोरमधून त्यांनी पदवी संपादन केली.