आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावे-प्रतिदाव्यांची रणधुमाळी:15-15 ग्रामपंचायतींवर शिवसेना, भाजपचा दावा; शिंदे गटही म्हणतो 2 आम्ही जिंकल्या

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील सिंधी पिंपळगाव येथील बिनविरोध निवड वगळता जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी जालना, बदनापूर व मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. या वेळी विजयी उमेदवारांची घोषणा करताच निवडून आलेल्या सदस्यांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. दुसरीकडे सर्वाधिक १५-१५ ग्रामपंचायतींवर शिवसेना-भाजपने दावा केला असून शिंदे गटानेही २ ग्रामपंचायती ताब्यात आल्याचे म्हटले. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्षही दावे करत होते. मात्र, सरपंच निवडीनंतरच या दाव्यांना पुष्टी मिळणार असल्यामुळे तोपर्यंत सदस्यांना एकत्र ठेवण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर कायम आहे. येत्या सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १४ तर डिसेंबरअखेर १४ अशा दोन्ही मिळून २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत ८६.५६ टक्के मतदान झाले. त्यामुळे ही मते नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकीत समर्थकांची साथ हवी म्हणून राजकीय पक्षांकडूनही स्थानिक पातळीवरील आघाड्यांना बळ देण्यात आले होते. याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी मतमोजणीअंती निवडून आलेल्या सदस्यांवर दावा करण्याची जणू स्पर्धाच राजकीय पक्षांमध्ये लागली होती. कुणी संपूर्ण पॅनलवर दावा करत होते, तर काही जण निम्मे सदस्य आमच्या पक्षाचे असल्याचे सांगत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत होते. सरपंचपदाच्या उमेदवाराला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन काही समर्थक देत होते. सप्टेंबर व डिसेंबरअखेर होणाऱ्या अनुक्रमे १४-१४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीपर्यंत विजयी सदस्यांना एकत्र ठेवण्याची कसरत अातापासूनच सुरू झाल्याचे दिसून आली.

विजयी सदस्यांचा सत्कार
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बदनापूर तालुक्यात १९ पैकी १५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा समर्थकांनी केला. यात मांडवा, चिखली, किन्होळा, धामणगाव, डोंगरगाव सा., मांजरगाव, ढोकसाळ, कुंभारी, माळेगाव, घोटण, सायगाव, राजेवाडी शे., रांजणगाव, मेव्हणा येथील विजयी सदस्यांचा आमदार कुचे यांनी संपर्क कार्यालयात सत्कार केला.

बदनापूर : १८ ग्रामपंचायतींचा निकाल
बदनापूर तालुक्यातील १९ पैकी १८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच आमदार नारायण कुचे यांनी १५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा केला, तर माजी आमदार संतोष सांबरे यांनी ११ ग्रामपंचायती शिवसेना व सहयोगी पक्षांकडे आल्याचे म्हटले. बिनविरोध निवड झाल्यामुळे सिंधी पिंपळगाव ग्रामपंचायत अगोदरच शिवसेनेच्या ताब्यात आली होती. मतमोजणीनंतर घोटण, सायगाव, डोंगरगाव, बुटेगाव, कडेगाव, माळेगाव, मांजरगाव, राजेवाडी, धामणगाव, मांडवा या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला. सहयोगी, मित्रपक्ष व स्थानिक पॅनलच्या सहकार्याने १९ पैकी ११ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवल्याचे माजी आमदार संतोष सांबरे व शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.

मंठा : १६ विजयी उमेदवारांत १० महिला सदस्या
मंठा तालुक्यातील वाघोडा तांडा येथील ग्रामपंचायतीसाठी ९ तर किर्तापूर येथे ७ जागांसाठी मतमोजणी झाली. यात १६ विजयी उमेदवारांत १० महिला सदस्या असून वाघोडा तांडा येथील दोन महिला सदस्या अगाेदरच बिनविरोध निवडल्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या १४ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. वाघोडा तांडा येथून निवडून आलेल्या सदस्यांत सुरेश राठोड, बबिता राठोड, सुनीता राठोड, अविनाश पवार, छाया राठोड, रंजना चव्हाण, अंबिका राठोड, कविता पवार, प्रदीप पवार यांचा समावेश आहे. किर्तापुरात दिगंबर पवार, कविता चव्हाण, सुखदेव इघारे, गीता पोटे, विजय इघारे, गंगासागर काळे, सखू पोटे हे निवडून आले. मतमोजणीसाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय शिंदे, हरिभाऊ ताठे, लक्ष्मीकांत कुलकर्णी आदींनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...