आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्क:सिन्नर : 22,117 मतदारांनी बजावला हक्क

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांसाठीच्या ४० आणि ८८ सदस्यपदांसाठी २९९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण २६ हजार ६८४ पैकी २२ हजार ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४८ मतदान केंद्रांवर ८२.८८ टक्के मतदारांनी मतदान केले. किरकोळ बाचाबाचीवगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मंगळवारी (दि. २०) तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.‌

तालुक्यातील आशापूर, कृष्णनगर, कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर, नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी आणि वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह ८८ सदस्यपदांसाठी मतदान पार पडले. यापूर्वी २४ जागांवर सदस्यांची अविरोध निवड झाली आहे. सकाळी मतदानाचा वेग काहीसा कमी होता. दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे दिसून आले. पूर्व भागातील शहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने मशीन बदलून द्यावे लागले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दोन तासांत बारा ग्रामपंचायतींच्या ४ हजार २२२ म्हणजे १५.८२ टक्के मतदारांनी मतदान केले होते. साडेअकरा वाजता मतदानाची टक्केवारी वाढून ३८.५९ झाली. दीड वाजेपर्यंत ती ५८.१४ टक्के होती. साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ७३.३९ टक्के गेली होती.

ठाणगावात घुटेवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार कायम
ठाणगाव ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या घुटेवाडी ग्रामस्थांनी मतदानापूर्वीच रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन मनरेगातून रस्ते बांधणीचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या उपरही मतदानाच्या दिवशी येथील ग्रामस्थांचा बहिष्कार कायम राहिला. ७० मतदारांनी या मतदान केंद्राकडे पाठ फिरवली.

ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान टक्केवारी
आशापूर (७९.३७), कीर्तांगळी (९०.२४), वडगाव पिंगळा (८६.२०), शास्त्रीनगर (९४.६७), कारवाडी (८१.१२), नांदूरशिंगोटे (८०.९३), पाटपिंप्री (८६.०३), शहा (८२.१८), सायाळे (८३.५३), उजनी(८६.६३), ठाणगाव (७४.०४), कृष्णनगर (डुबेरवाडी) (८८.१२),

सायाळेत पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
सायाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदार यादीत शेजारील मलढोण येथील १२ मतदारांची नावे समाविष्ट होती. हे मतदार मतदानासाठी आल्यानंतर त्यांना मतदान करण्यास एका गटाने आक्षेप घेतल्यावर वादाचा प्रसंग उद्भवला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावास पांगवले.

बातम्या आणखी आहेत...