आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात शुक्रवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाट व अवकाळी पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने सोंगणीसाठी आलेले मकाचे पिक तसेच सुर्यफुल जमिनीवर आडवे झोपले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान हवामान खात्याने आणखी काही दिवस अवकाळीचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग उभे राहीले आहे. सलग दोन वर्षापासून रब्बीत नुकसान सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना यंदा देखील मागील दिवस समोर येते की काय?अशी धास्ती उभी राहीली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी साहेब कायबी करा पण आता थेट मदत करा अशी आर्त हाक शासन दरबारी घातली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील सहा ते सात वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे.
कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पुरते हैराण झाले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मुबलक पाण्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका, ज्वारी, सुर्यफुल आदी पिकांची ६७ हजार ४०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन रब्बीतील पिके अफाट कष्ट घेऊन बहरवली. परंतु रब्बी हंगाम आता आटोक्यात येत असताना उशिरा पेरणी केलेल्या पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांना शुक्रवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस पडेल या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी जमेल त्या पद्धतीने गहू, हरभऱ्याच्या सोंगणीला सुरुवात करुन पिके मळणी करुन घरी आणली आहे. परंतु अद्यापही अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. शुक्रवारी पिंपळगाव रेणुकाई परिसरात काही भागात विजांच्या कडकडाटासह अधूनमधून अवकाळी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे मका तसेच सुर्यफुलाचे नुकसान झाले आहे.
अशातच काही शेतकऱ्यांनी शेतात हरभरा, गहु पिकाची सोंगणी करुन ठेवली आहे. ती पिके पावसात भिजली असल्याने त्यांना फटका बसण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरीपात नुकसान झाले. उसनवारी करून रब्बीची पेरणी केली आणि त्यात देखील आता हे अस्मानी संकट उभे राहीले असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यास कारणीभूत ठरत असल्याने शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी सोंगणी करुन ठेवलेल्या पिंकाना ताडपतरीद्वारे झाकण्याची लगबग सुरू केली होती.
आंबे, द्राक्षांना फटका
बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे व द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दीड एकर मका पिकाचे झाले नुकसान
खरीपात नुकसान झाले म्हणून रब्बीत मोठी मेहनत घेऊन नुकसान भरुन काढण्यासाठी पिकांना मोठा खर्च करुन पिके हातात आणली. आता घास हातातोंडाशी आलेला आहे. यातच शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यात दीड एकर मकाचे पिक जमिनीवर आडवे झोपले आहे. दरवर्षीच अशी परिस्थिती उद्भवत असल्याने शेतकरी रस्त्यावर आले आहे. सध्या हजारो हेक्टरवर पिके शेतात उभी आहेत. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. - गणेशराव देशमुख, शेतकरी, पिंपळगाव रे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.