आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलआक्रोश मोर्चा:जिल्ह्यातील कोणत्या नेत्याने किती विकासकामे केली याचा एकदा समोरासमोर बसून हिशेब करा; रावसाहेब दानवे यांचे जिल्ह्यातील नेत्यांना उघड आव्हान

जालना17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा पाणीप्रश्न लक्षात घेऊन भाजपने पक्षभेद न पाहता अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी १२९ कोटींचा निधी दिला, ७० कोटींचे सिमेंट रस्ते केले, शहराबाहेरुन सिमेंटचा रिंग रोड केला, ड्रायपोर्ट, आयसीटी, समृध्दी महामार्ग सारखे महत्वकांक्षी प्रकल्प आणले. आमच्याकडे आम्ही केलेल्या कामांचा हिशेब आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा समोरासमोर बसावे आणि त्यांनी केलेली कोणतेही पाच विकासकामे दाखवावीत असे उघड आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विरोधकांना दिले. भाजपच्या वतीने आयोजित जलआक्रोश मोर्चा प्रसंगी ते बोलत होते.

शहराच्या पाणीप्रश्नावर भाजपाच्यावतीने आज बुधवारी जालना नगर पालिकेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मामा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. वीर सावरकर चौक, फुलबाजार, नेहरू रोड, सराफा, बेझंजी रोड, कादराबाद, पाणीवेस, मुथा बिल्डींग, मस्तगड, गांधी चमनमार्गे हा मोर्चा नगर पालिकेवर धडकला. नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, गोविंदराव केंद्रे, बसवराज मंगरूळे, इद्रीस मुलतानी, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर पाटील, विलास नाईक, सुनील आर्दड, सिध्दीविनायक मुळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना केंद्रीयमंत्री दानवे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

जालना शहराच्या पाणीप्रश्नाकडे सरकार म्हणून तुमचे लक्ष असलं पाहिजे, तुमच्या दुर्लक्षामुळेच शहराचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे.जालना शहराची गरज ५८ एमएलडी पाण्याची असताना प्रत्यक्षात शहराला १५ एमएलडीच पाणी मिळते, त्यामुळे सर्वांना पाणी कसे मिळेल, वस्ती वाढली, पाण्याचे नियोजन अगोदरच व्हायला पाहिजे होते, परंतू याकडे कुणाचे लक्षच नसल्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही आक्रोश मोर्चा काढला. आता शहराला मुबलक पाणी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा केंद्रीयमंत्री दानवे यांनी यावेळी दिला.विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही मविआ सरकारवर हल्लाबोल केला. मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी आले होते. त्यांना प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आणि प्रस्ताव येताच एकाच दिवसात जालना शहरासाठी १२९ कोटी रूपयांची अंतर्गत वितरण योजना मंजूर केली. परंतू प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे ही योजना रखडली. मंत्री दानवेंनी पाचशे कोटी रूपये आणले परंतू मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात जालना जिल्ह्याला दमडीही दिली नाही असा आरोप केला.

तीन चाकांची रिक्षा पंक्चर झाल्याचा टोला
राज्यात भाजपाचे सरकार आणि मंत्री रावसाहेब पा. दानवे हे प्रदेशाध्यक्ष असताना जिल्ह्यात विकासाची बुलेट ट्रेन धावत होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन चाकांचे सरकार आले आणि विकासाची रिक्षाच पंक्चर झाल्याचा टोला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करआबा दानवे यांनी लगावला. शहरातील नागरीकांना स्वच्छता, पिण्याचे पाणी, विज पाहिजे, आठवड्यातून दोन वेळा पाणी पाहिजे. जालना पालिकेकडून एक महिना पाणी दिल्यावर बारा महिन्याची पाणीपट्टी घेतली जाते, हे संयुक्तीक नसल्याचे भास्कर दानवे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस शतरंज का बादशाह
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी जी खेळी केली त्यामुळे भले भले राजकीय नेते गार झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने शतरंज का बादशहा आहेत असे आमदार संतोष दानवे म्हणाले. शहराच्या पालिकेत जरी काँग्रेसची सत्ता असली तरी या शहराची वाट लावण्यात जर कुणी दोषी असेल शिवसेना सर्वाधिक दोषी असल्याचा आरोप आमदार संतोष दानवे यांनी केला. फडणवीस सरकारने येथील उद्योगांना वीज दरात सवलत दिली मात्र आघाडी सरकारने ही सबसिडी बंद करण्याचा घाट घातला असल्याचा आरोपही आमदार दानवे यांनी केला. दरम्यान पावसाच्या सरी बरसत असतानाही केंद्रीयमंत्री दानवे आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांचे भाषण सुरु होते.

शिवसेनेला धडा शिकवा
पालिकेत सत्ता नसताना मंत्री दानवे यांच्या माध्यमातून शहरात सिमेंट रस्ते तयार केले, रिंगरोड केला, लोखंडी पुल उभारला, आयसीटी, सिड्स पार्कसाठी निधीची तरतुद केली, समृध्दी महामार्ग जालन्यातून नेला. सत्ता नसताना आम्ही ही कामे केली आहे. मात्र महाविकास आघाडीने काहीच केले नाही असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी केला. गेली अनेक वर्षे जालना पालिकेत शिवसेना, कॉँग्रेस, राकॉँने सत्ता उपभोगली, परंतू शहरातील नागरी प्रश्न ‘जैसे थे’च आहे. पाण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतो, ही चांगली बाब नाही. त्यामुळे आघाडीतील या पक्षांना आणि त्यातही शिवसेनेला धडा शिकवा.

शहरातील पाणीप्रश्नाला आजी-माजी मंत्री जबाबदार
जालना शहरात १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना पाणीपट्टी मात्र ३ हजार घेतली जाते. वसुलीच्या तुलनेत तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केली. या अवस्थेला माजीमंत्री व आताचे पालकमंत्री जबाबदार आहेत. आपल्या पदाच्या काळात जालना जिल्ह्यासाठी किती निधी आला, याचा मारोतीच्या पारावर बसून हिशेब कराच. असे आवाहन करुन आमदार कुचे यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकतेच विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार आता जालना व बदनापुर या दोन स्वतंत्र बाजार समिती असणार आहेत. परंतु बदनापुर बाजार समितीची कर्मचाऱ्यांची पगार देण्याची क्षमता नाही असे असतानाही ही बाजार समिती वेगळी करण्यात आली आहे. केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करीत आमदार कुचे यांनी राज्यातील महाआघाडी सरकारच्या कारभारावर कडाडून टिका केली.

बातम्या आणखी आहेत...