आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु कोविड १९ पासून जालना जिल्ह्यातील ६ हजार आवेदन पत्र जिल्हा बांधकाम अधिकाऱ्याकडे प्रलंबित असल्याने बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना प्रथम दोन पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो मात्र जालना जिल्हा कार्यालयाकडून चुकीचे कारण दाखवत शिष्यवृत्ती अर्ज फेटाळले जात असल्याने बांधकाम कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विविध योजनेअंतर्गत २८ हजार ९७४ लाभार्थींनी अर्ज केलेले आहे त्यापैकी १४ हजार ३७३ अर्ज मंजूर करण्यात आले तर २ हजार २९९ अर्ज नामंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना पाल्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरवर्षी ५ हजार तर अकरावी, बारावी साठी दरवर्षी १० हजार, पदवीसाठी २० हजार, वैद्यकीय,अभियांत्रिकी शिक्षणासाठी ६० हजार ते १ लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. जालना जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विविध योजनेनुसार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज २०१९ पासून दाखल केलेले आहेत. तसेच २०१९-२०२०,२०२०-२०२१,२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात देखील शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाईन आवेदन पात्र सादर केलेले आहेत परंतु जालना जिल्हा कार्यालयाकडून या आवेदन पात्रांची पडताळणी मागील २ वर्षांपासून करण्यात आलेली नसल्यामुळे सदरील अर्ज प्रलंबित पडलेले आहेत.
जालना जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडे शिष्यवृत्ती,तसेच इतर योजनेनुसार २८ हजार ९७४ आवेदन पत्र दाखल झालेले असून त्यापैकी १४ हजार ३७३ अर्ज मंजूर करण्यात आले तर २ हजार २९९ अर्ज चुकीचे कारण पुढे करून थेट नाकारण्यात आलेले आहे तसेच फेबु. मध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असतांना व त्यांनी नोंदणी नंतर शिष्यवृत्ती अर्ज दाखल केलेले असतांना त्यांना नोंदणीपूर्व शिक्षण असा शेरा मारून शिष्यवृत्ती नाकारण्यात आली आहे तर काहींना प्रथम पाल्य असतांना तिसरे अपत्य असल्याचा शेरा नोंदवून शिष्यवृत्ती नाकारण्यात आली एकंदरीत बांधकाम कामगार पाल्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम जालना जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडून केले जात आहे. सध्या विविध शिष्यवृचे ६ हजार व इतर योजनेचे १ हजार ८०३ अर्ज जालना जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडे प्रलंबित आहे,विशेष म्हणजे या कार्यालयात अधिकारी वर्ग नियमित हजर राहत नसल्यामुळे बांधकाम कामगारांना विविध शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पंधरा दिवसांत अर्ज निकाली
बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्ती योजनेतर्गत प्राप्त अर्ज येत्या पंधरा दिवसात निकाली काढले जातील. ज्या कामगारांना दोन पेक्षा जास्त अपत्य असेल त्यांना केवळ दोन प्रथम आपत्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, जर चुकीने एखादा अर्ज रद्द केला गेला असेल तर दुरुस्त केले जाईल. चंद्रकांत राऊत, विभागीय उपयुक्त बांधकाम कामगार कल्याण, औरंगाबाद
वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन छेडले जाईल
जालना जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवले जात आहे २०१९ पासून विविध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेले असतांना आज पर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही ,कार्यालयात मुख्य अधिकारी गजर राहत नाही तक्रारीची दाखल घेतली जात नाही. चुकीचे कारण दाखवून शिष्यवृत्ती अर्ज फेटाळले जात आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर तालुकाध्यक्ष रविराज वाहुळ यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.