आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंठा नवरात्र महोत्सवात सामाजिक उपक्रम; कायदेविषयक शिबिर, रक्तदान शिबिर, आहार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेणुका देवी नवरात्रोत्सवात यंदा विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये कायदेविषयक शिबीर, रक्तदान शिबीर, शरीर तपासणी व आहार मार्गदर्शन मेळावा, मोफत फराळ तसेच चहापान आणि देवी भक्तांसाठी मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली.विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उपक्रमांचीही चर्चा भाविकात ऐकायला मिळाली. रेणुका देवी संस्थानात दरवर्षी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मंठा तालुका वकील संघाच्या वतीने, कायदे विषयक जागरुकता निर्माण व्हावी या दृष्टीने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.

या शिबिराला दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच जय भद्रा ग्रुपच्या वतीने संपूर्ण शारीरिक तपासणी आणि आहार विषयक मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. रेणुका माता संस्थानच्या वतीने 02 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थांच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ.राजू राठोड, लक्ष्मण पराडे, पूजा निर्वळ, कृष्णा सोनवणे उपस्थित होते.

सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या वतीने मागील चार-पाच वर्षांपासून देवी भक्तांना सेलू ते मंठा आणि परत अशी मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. डॉ.संजय रोडगे यांनीही मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे हजारो भाविकांना मोफत दर्शनाचा लाभ झाला. अनेक दानशूर संस्था आणि व्यक्ती तसेच संघटनांच्या वतीने देवी मंदिर रस्त्यावर मोफत फराळ, चहापाण्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नवरात्र महोत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...