आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेट अँड वॉच:सोयाबीनला मिळतोय अल्प भाव,  विक्रीसाठी शेतकऱ्यांचे वेट अँड वॉच

तीर्थपुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेतातच कोंब फुटले होते.ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केला होता. यामुळे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन काळे पडले होते तर काहीं शेतकऱ्यांचे कापणी केलेले सोयाबीन शेतातचपडून राहिल्याने शेंगांना जागेवरच कोंब फुटले होते.

तीन महिन्यात निघणारे सोयाबीनच्या पिकाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत असल्याने आणि एखाद्या पिकाची डबल फेर पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनचे पीक घेतल्यास शेताची चांगली मशागत होऊन फेर पिकाला त्याचा चांगला फायदा मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनच्या पिकाला पसंती देतात. सध्या बाजारात किराणा, कापड व इतर गरजू वस्तूंचे भाव गगनाला भिडले असतांना शेतमालाला मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक बजेट कोलमडून पडत आहे. अशा महागाईच्या काळात सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यात यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेरणीला पहिली पसंती देत अधिकचा पेरा केला.

पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावल्याने पेरणी एक महिना उशिरा झाली. उशिरा पेरणी करूनही यंदा सोयाबीन चांगले आले होते. सततच्या पाऊस आणि ऑगस्टमध्ये पंधरा ते वीस दिवस उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटून रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तरीही शेतकरी डगमगला नाही. महागड्या औषधीची फवारण्या करून पिकाची जपवणूक केली. परंतु ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने पुन्हा नुकसान केले. कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी संकटावर मात करत पिकाचे उत्पादन काढले. परंतु बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सध्या बाजारात चार हजार आठशे, पाच हजार ते साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यादरम्यान मालाला भाव मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे ते शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांना सात हजारापर्यंत भाव वाढण्याची आशा आहे ते शेतकरी आपले सोयाबीन वाळवून साठा करून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, नेहमी या दिवसात शंभर टनाच्यावर आवक असते परंतु भाव कमी असल्याने आज गुरुवारी केवळ वीस टन आवक झाल्याचे कृषी उत्पन्नबाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेे. दरम्यान, अतिवृष्टीने पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनवर केलेला खर्चही निघत नाही. शासनाने सोयाबीनला किमान ७ हजार ते कमाल १० हजार रुपये हमी भाव दयावा,अशी मागणी बाणेगावचे शेतकरी बप्पासाहेब घुमरे यांनी केली.

सोयाबीनला शासनाने दहा हजार रुपयांचा हमीभाव दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारपेठेत योग्य भाव मिळाला तर शेतकरी टिकेल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यात पुन्हा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटात पिचून जात आहे. सोयाबीनला १० हजारांचा हमीभाव मिळायला पाहिजे,असे तीर्थपुरी येथील शेतकरी महादेव चिमणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...