आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पैसे घेण्यासाठी नातेवाइकांकडे आल्यावर वाद झाला. यातून महिलेच्या गळा, पोटावर चाकूचे सहा वार केले. यानंतर पोत्यात टाकून महिलेस कालव्याच्या पाण्यात टाकून दिले. रक्तबंबाळ अवस्थेत महिलेने पोत्यातून बाहेर येत जीव वाचवला. १३ जानेवारीला रात्री अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ ही घटना घडली. सुशीला राठोड (नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे महिलेचे नाव आहे. औरंगाबादेतील घाटीत तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुशीला या अंबड तालुक्यातील डोणगाव तांडा येथील नातेवाइकांकडे पैसे घेण्यासाठी आल्या होत्या. वाद झाल्यानंतर काही जणांनी त्यांना कारमध्ये टाकले व नंतर गळ्यावर, पोटावर चाकूने सहा वार केले. त्यांचा मृत्यू झाला असे समजून आरोपींनी त्यांना पोत्यात बांधून जवळील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात टाकले. पाण्यात व पोत्यातून कसेबसे बाहेर पडून त्यांनी सुटका करून घेतली.
डॉ. जावळे, लक्ष्मण जाधव, इंदानी यांच्या मदतीने प्राथमिक उपचार करून त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांनी सुशीला यांनी सांगितलेल्या वर्णनावरून व मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंकुश राठोड, रवी अंकुश राठोड व एक महिला यांनी वार केल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
१० जानेवारीला जालन्यात एका स्वयंपाकी महिलेचे दोघांनी कारमधून अपहरण केले होते. त्या महिलेनेही रात्री दीड वाजेपर्यंत झुंज देत सुटका केली. पोलिस निवडणुकीच्या बंदोबस्तात असल्याने आरोपी फरार आहेत.
जबाब घेण्यासाठी औरंगाबादला रवाना
गंभीर जखमी महिलेवर रात्री उपचार गरजेचे होते. प्राथमिक उपचार करून तिला औरंगाबादला हलवले आहे. जबाब घेण्यासाठी एक पोलिस कर्मचारी औरंगाबादला गेला आहे. - हनुमंत वारे, एपीआय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.