आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसंबी:पोस्टाच्या लिफाफ्यावर जालना मोसंबी जीआयची मोहोर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्याच्या मोसंबीला जीआय अर्थात भौगोलिक मानांकन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय डाक विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या लिफाफ्याचे प्रकाशन सोमवारी शहरातील मधुर बँक्वेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रदीप पराते व औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्टर जनरल अदनान अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे जालन्याच्या मोसंबीचा नावलौकिक देशभरात पोहोचणार असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बीपीजी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. व जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ यांच्या वतीने आयोजित जालना मोसंबी भौगोलिक मानांकन व विशेष आवरणाच्या प्रकाशनप्रसंगी जालना, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव आदी जिल्ह्यातील ६०० हून शेतकरी उपस्थित होते. आमदार टोपे म्हणाले की, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या सहकार्याने अधिक तंत्रशुद्धपणे मोसंबी उत्पादन घेण्यात यावे. देशात नव्हे तर जगात मोसंबी घ्यावी तर जालना जिल्ह्याचीच अशी ओळख निर्माण झाली पाहिजे.

तसेच या मानांकन प्रक्रियेसाठी पालकमंत्री असताना संपूर्ण सहकार्य होते, आताही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाहीही टोपे यांनी दिली. प्रास्ताविक नाबार्डचे जिल्हा प्रबंधक तेजल क्षीरसागर यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रेणुका भावसार यांनी केले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आयसीटीचे संचालक प्रो. यू. एस. अन्नापुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, जिल्हा मोसंबी बागायतदार संघाचे अध्यक्ष पांडुरंग डोंगरे, रिलायन्स मोसंबी विक्री व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर दत्तात्रय मोरे, विग्रोचे ज्ञानेश्वर कदम व खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शशिकांत पाटील, मोसंबी बागायतदार संघाचे सचिव अतुल लड्डा, बीपीजी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भास्कर पडूळ, संचालक गणेश पडूळ आदींची उपस्थिती होती.

मोसंबीचे ब्रँडिंग झाले पाहिजे
मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालन्याला भौगोलिक मानांकन मिळाले, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खास वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या या मोसंबीचे ब्रँडिंग झाले पाहिजे, यासाठी अधिकधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, अशी अपेक्षा आमदार राजेश टाेपे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...