आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामान खात्याच्या अंदाज चुकवत मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने कासावीस झालेले शेतकरी आर्द्राच्या पहिल्याच पावसाने सुखावले आहेत. जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारी व सायंकाळी तासभर बरसलेल्या पावसाने जणू पेरते व्हा ची साद घातल्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. तर यापुर्वी तुरळक पावसावर पेरणी केलेल्या पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.
जालना शहरात दुपारी १ वाजेदरम्यान अंबड रोड, नूतन वसाहत, मोतीबाग, शनी मंदिर, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, भोकरदन नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंठा चौफुली आदी भागात १५ मिनिटे पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच-पाणी करून टाकले होते मात्र नवीन जालना भागातील कन्हैयानगर, नवीन मोंढा, महेशनगर, हनुमान घाट, दत्तनगर आदी भागात फक्त पावसाची भुरभुर झाली. यामुळे अर्ध्या शहरात पाऊस अन् अर्ध्या भागात ऊन अशी स्थिती होती. मात्र, सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तब्बल तासभर सुरू असलेल्या पावसाने संपूर्ण शहर व परिसरात पाणीच-पाणी करून टाकले. शहरातील सखल भागात पाणी साचले तर काही ठिकाणी नाले भरून वाहू लागले. भाग्यनगर व शनिमंदिर लगतच्या खोलगट भागात गुडघाभर पाणी साचले होते. शिवाय, याठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
भाग्यनगरचा नाला ओव्हरफ्लो, गटाराचे पाणी रस्त्यावर
वर्षानुवर्षांचा अनुभव असतानाही नगरपालिकेने नालेसफाईच्या कामांना बगल दिल्यामुळे नाले काडी-कचरा, प्लॉस्टिकने तुडूंब भरलेले आहे. तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर थातूरमातूर सफाई करण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. याचाच परिणाम म्हणून जुना जालना भागातील भाग्यनगर, रेल्वे उड्डाणपुलालगतचा नाला ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला.
चाकरमान्यांसह सर्वांचीच पावसाने धांदल
सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयातच अडकून बसावे लागले. अनेकजण रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाने औरंगाबाद, परतूर, सेलूपर्यंत अप-डाऊन करतात, यामुळे घराची ओढीने काहींनी पावसात भिजणे पसंत केले. तर शहरातच वास्तव्यास असलेल्यांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सर्व्हे नं. ४८८ मध्येच बहुतांश शासकीय कार्यालये असल्यामुळे बायपास रस्त्याने चाकरमान्यांची जणू रीघ लागली होती.
ग्रामीणमध्ये शेतकरी आनंदी, पेरणीला वेग
पिंपळगाव रेणुकाई परिसरात तब्बल तासभर झालेल्या पावसाने धुवाधार पावसाने शेतात सगळीकडे पाणी तुंबले. पलेहा, शेलुद, अवघडराव सांवगी, वरुड, करजगाव, कल्याणी, रेलगाव,कोसगाव,मोहळाई आदीसह इतर भागात देखील पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.