आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत असून, पहिला पेपर मराठी विषयाचा आहे. जिल्ह्यातील १०० केंद्रांवर ३० हजार ३५० विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत. इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीची परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशानुसार १८ भरारी पथके नेमण्यात आली असून, संवेदनशील ५० केंद्रांवर बैठे पथक तसेच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रात पेन, पॅड व पाण्याची बॉटली नेण्याची मुभा देण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विषयनिहाय सकाळी ११ ते दुपारी १, ११ ते १.३०, ११ ते २ व दुपारी ३ ते ६ अशी या परीक्षेची वेळ असणार आहे. मात्र परीक्षा केंद्रांवर पेपर सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षार्थींना पोहोचावे लागणार आहे.
२ ते २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत पहिला पेपर मराठीचा तर शेवटचा पेपर भूगोल विषयाचा असेल. दरम्यान, आयुष्याला वळण देणारी ही परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पेपर सोडवावेत, कुणीही कॉपी करू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. कॉपीमुक्ती अभियानाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी. यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांनाही याबाबत अवगत करण्यात आले आहे.
मात्र, यापूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन काही संवेदनशील केंद्रांची निवड करत त्या ठिकाणी बैठे पथक, भरारी पथकांसोबत पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी १ ते १५ मार्चपर्यंत जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.
या वस्तूंना परीक्षा केंद्रात नेण्यास असणार मज्जाव
परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये जाताना कोरा कागद,कॅल्युलेट,माेब ाइल,इलेक्ट्राॅनिक्स घड्याळ या वस्तू नेण्यास मज्जाव असेल. फक्त कंपास,पेन, पाण्याची बाटली, पॅड, हाॅल तिकीट, शाळेचे आेळखपत्र सोबत नेता येईल. या व्यतीरिक्त परीक्षा हॉलमध्ये एकही वस्तू नेता येणार नाही.
आनंदाने पेपर सोडवा
विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासानुसार आनंदाने पेपर सोडवावेत, परीक्षेचा ताण घेऊ नये. ज्या नोट्स काढलेल्या आहेत, त्याची एक दिवस अगोदर उजळणी करावी. पालकांनी दबाव न आणता हसतमुखाने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, परीक्षेला शुभेच्छा द्याव्यात. -डॉ. प्रकाश अंबेकर, मानसोपचारतज्ज्ञ
१३ दिवस सुट्यांमुळे उजळणीची संधी
२, ३, ४, ६, ८, १०, १३, १५, १७, २०, २३ व २५ असे १२ दिवस पेपर होणार असून, सुरुवातीचे तीन पेपर वगळता इतर पेपरांच्या मध्ये एक किंवा दोन सुट्या आलेल्या आहेत. अर्थात आतापर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांचा सराव करण्याची संधी यामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.