आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा आज:पूर्वीच्या प्रवेशपत्रावर मिळेल विद्यार्थ्यांना प्रवेश; विविध 121 केंद्रांवर 13 हजार 623 विद्यार्थी देणार परीक्षा

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पूर्वीचेच परीक्षा पत्र या परीक्षेसाठी चालणार आहेत. ही परीक्षा आज रविवारी (३१ जुलै) रोजी सकाळी ११ ते १२:३०, दुपारी १:३० ते ३ या वेळेत होणार आहे.

इयत्ता पाचवी तसेच आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै २०२२ होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून जालना जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व परीक्षा केंद्रसंचालक यांची परीक्षा पूर्वतयारी बैठक शनिवारी घेण्यात आली. सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर बैठे पथक व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

सदरील परीक्षेस जालना जिल्ह्यातील इयत्ता पाचवीचे ६,९८८ विद्यार्थी असून ७१ परीक्षा केंद्रे आहेत तसेच इयत्ता आठवीचे ६,६३५ विद्यार्थी असून ५० परीक्षा केंद्रे आहेत, असे एकूण १३,६२३ विद्यार्थी १२१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या नियोजनासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी उपस्थित केंद्रसंचालक हे नियेाजन पाहत आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात परीक्षा देता येईल असे नियोजन करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी सांगितले.

दोन सत्रांत होईल परीक्षा
दोन रविवारी सकाळी ८ वाजता गोपनीय साहित्य संबंधित केंद्रांवर पोहोचवले जाणार असून दोन सत्रांत हे पेपर होणार आहेत. सकाळच्या सत्रात : ११ ते १२: ३० तसेच दुपारच्या सत्रात १.३० ते ३ या वेळेत होणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व परीक्षा केंद्रसंचालक यांची परीक्षा पूर्वतयारी बैठक शनिवारी घेण्यात आली. या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता.

२० जुलै रोजीचे हॉलतिकीट ग्राह्य : पूर्वीच्याच म्हणजे यापूर्वी निर्गमित केलेली २० जुलै २०२२ चे प्रवेशपत्र या परीक्षेस ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम न बाळगता परीक्षा केंद्रावर वेळेत हजर व्हावे. प्रशासनाकडून तयारी केली आहे. अर्धा तास आधी केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...